शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह कोण आहेत?


कोल्हापूर | शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह कोण आहेत?, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या चालू असलेल्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठींबा देत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
हे फक्त पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन नाही तर सर्व देशातील शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. आम्ही न्याय मागत आहोत मग पोलीस बळाचा वापर का?, शेतकरी काय अतिरेकी आहेत का?, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
कोणत्याही शेतकऱ्याला आपली बाजू मांडू दिली नाही. गेल्या सहा महिन्यात पंतप्रधानांना अनेक पत्र लिहिलीत मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचं शेट्टी म्हणाले.
दरम्यान, आमच्या भावना दिल्लीपर्यंत पोहोचल्या पाहिजे. येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात दिल्लीपेक्षा मोठं आंदोलन होईल. दिल्लीतील शेतकऱ्यांचं समाधान नाही झालं तर एकाही केंद्रीय मंत्र्याला फिरू देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे.