दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा महामार्ग बंद , दिल्लीतील सीमांवर शेतकरी ठिय्या


नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे सध्या दिल्लीत आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे केंद्र सरकारची वाटाघाटींची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली असून मोठा जमाव दिल्ली-नोएडा सीमेवर दाखल झाल्याने दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा महामार्ग बंद करण्यात आला आहे. दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्यामुळे दिल्लीत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली
शेतकरी नेत्यांनी चर्चेसाठी समिती नेमण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्याचबरोबर तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या भूमिकेवर शेतकरी नेते ठाम राहिले. त्यामुळे सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगून निदर्शक शेतकऱ्यांशी चर्चा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे चर्चेची पुढची फेरी तीन डिसेंबर रोजी होणार आहे.
या चर्चेत पंजाबमधील 32 संघटनांचे नेते, हरियाणामधील दोन प्रतिनिधी आणि उत्तर प्रदेशमधील एक नेता सहभागी झाले होते. या कायद्यांना रद्द करण्याच्या मुद्द्यावर शेतकरी नेते ठाम राहिले. नवी दिल्लीतील बुरारी मैदानावर जाण्याचे सरकारचे आवाहनही शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावले.