पुण्यात प्रेमप्रकरणातून एका तरुणावर कोयत्याने वार

पुणे: प्रेमप्रकरणातून एका तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दांडेकर पूल परिसरात घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे समीर राहुल हातागळे (वय २०, रा. दांडेकर पूल) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी समीर याचा मित्र आकाश मस्के (२३) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार हर्षद गणेश जातेगावकर, गणेश जातेगावकर व त्यांच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आकाश, जखमी समीर व त्यांचे मित्र दांडेकर पूल येथील राजीव गांधीनगर येथे शेकोटी करीत बसले होते. त्या वेळी आरोपी त्या ठिकाणी आले. आरोपीने त्याच्या सावत्र बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून समीरवर कोयत्याने वार केले. समीरच्या कानाजवळ, पाठीवर, कमरेवर, हातावर वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. वार केल्यानंतर आरोपी निघून गेले. घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.