स्मार्ट सिटी: पिंपरी चिंचवड शहराने चौथ्या क्रमांकावरुन दुस-या क्रमांकावर स्थान

पिंपरी: स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या राज्यस्तरीय यादीमध्ये पिंपरी चिंचवड शहराने चौथ्या क्रमांकावरुन दुस-या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. स्मार्ट सिटीत तिस-या टप्प्यात सहभागी होऊनही शहराचे रँकिंग वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत होत असलेल्या कामाची पावती म्हणून हे स्थान मिळविता आले आहे. तर, पुणे शहराचा पहिला क्रमांक आहे.
याबाबतची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने राज्यस्तरीय यादी जाहीर केली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पांची संख्या, चालू प्रकल्प, निविदा टप्प्यातील प्रकल्प, डीपीआर टप्प्यातील प्रकल्प आणि वापरलेल्या निधीची रक्कम याचा आधार घेऊन ही रँकींग देण्यात आली.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या देखरेखीखाली शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत. कोरोना काळातही शहरात स्मार्ट सिटीची कामे चालू होती. प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. त्यामुळे राज्यातील नऊ शहरात पिंपरी चिंचवडने दुस-या क्रमाकांवर झेप घेतली असून ही सुधारणा शहराला चालणा देणारी आहे.
याबाबत बोलताना स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गत झालेले काम आणि खर्च यानुसार रँकींग काढले आहे. शहरातील सर्व कामांच्या निविदा झाल्या आहेत. कामे सुरु आहेत. त्यामुळे शहराचा रँकींगमध्ये नंबर वाढत आहे. राज्यातील नऊ शहरांमध्ये पिंपरी चिंचवड दुसऱ्या नंबरवर आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत कामांसाठी साडेतीनशे कोटीच्या आसपास खर्च झाला आहे. सर्व कामे चालू आहेत. त्यामुळे खर्च होत आहे. उर्वरित शहरांचा दुस-या टप्यात स्मार्ट सिटीत समावेश झाला. पिंपरी चिंचवडचा तिस-या टप्प्यात समावेश झाला होता. सर्वात शेवटी सहभाही होऊन सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानुसार वर्क ऑर्डरही दिल्या आहेत. फिल्डवर कामे सुरु आहेत. त्यामुळे जसे प्रकल्प संपत जातील. तस-तसे शहराचा रँकींग वाढत जाईल असे त्यांनी म्हटले आहे.