सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग आणि श्रेणी सुधार परीक्षा दि. 8 डिसेंबरपासून

पुणे विद्यापीठाचे सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थी देणार परीक्षा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग आणि श्रेणी सुधार परीक्षा दि. 8 डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही परीक्षा ‘प्रॉक्‍टर्ड’ पद्धतीने होणार आहेत. यासाठी विद्यापीठाची यंत्रणा सज्ज झाली आहे. या परीक्षेपूर्वी सराव परीक्षा झाल्याने या परीक्षा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.

विद्यापीठाच्या दि. 8 ते 23 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष पूर्व विद्यार्थ्यांच्या विषय राहिलेल्या (बॅकलॉग) आणि श्रेणी सुधार परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाला लॉकडाउनमुळे वेळ मिळाल्याने, अनेक विषयांच्या परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे.

ऑनलाइन परीक्षांचा अंदाज येण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली आहे. या परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल चॉइस क्‍वेश्‍चन म्हजणेच एमसीक्‍यू) पद्धतीने होणार आहे.

विद्यापीठाने ऑक्‍टोबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने घेतल्या होत्या. त्यावेळी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता या अडचणींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. जवळपास पावणेतीन लाख विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत.

एमसीक्‍यू प्रश्‍न कसे सोडवावेत ?
– परीक्षेत प्रश्‍न आल्यानंतर सर्व सूचना व्यवस्थित वाचन करा.
– प्रश्‍न व पर्याय नीट वाचा, गृहितकाच्या आधारे उत्तर देऊ नका
– एमसीक्‍यू पद्धतीत वेळेला महत्त्व आहे, त्यामुळे सोपे प्रश्‍न आधी सोडवा.

गैरप्रकार थांबणार
या परीक्षा पद्धतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने परीक्षार्थींवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी कॅमेराचा वापर करण्यात येणार असून, विद्यार्थ्याचे काही छायाचित्रे देखील काढण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याव्यतिरिक्त अन्य हालचाली झाल्याचे आढल्यास त्याबाबतचा इशारा विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना गैरप्रकार करता येणार नाही.

Latest News