रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठेला पुणे विद्यापीठाने ‘धडा’

bote

पुणे : अहमदनगरच्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठेला पुणे विद्यापीठाने ‘धडा’ शिकवला आहे. बाळ बोठेचे राजकीय पत्रकारितेचे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतलेला आहे.

पुणे विद्यापीठाने कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून राजकीय पत्रकारिता हा विषय सुरु केला होता. या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी बोठे याच्या राजकीय पत्रकारिता या पुस्तकाची निवड करण्यात आली होती. आता हेच पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतलेला आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

बाळासाहेब बोठेच्या ‘राजकारण आणि माध्यमं’ या पुस्तकाचा एम. ए. अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात संदर्भग्रंथ म्हणून समावेश आहे. हेच पुस्तक यावर्षी कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या राजकीय पत्रकारिता विषयाच्या अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून निवडले गेले गेले होते. मात्र रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणात बोठेचे नाव पुढे आल्यानंतर पुणे विद्यापीठाने बोठेला मोठा धडा शिकवलाय.

बाळासाहेब बोठे याची आतापर्यंत तब्बल 14 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. बाळासाहेब बोठे याच्या या पुस्तकांपैकी 6 पुस्तकांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुद्दे आणि गुद्दे, पक्ष आणि निष्पक्ष, कानोकानी-पानोपानी आणि नेतृत्व मीमांसा ही 4 पुस्तकं पुणे विद्यापीठाच्या कला शाखेच्या राज्यशास्त्र विषयासाठी संदर्भग्रंथ म्हणून निवडण्यात आली आहेत.

बाळासाहेब बोठे अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याने राज्यातील नावाजलेल्या वर्तमानपत्रांमध्ये बातमीदार, मुख्य बातमीदार, राजकीय संपादक आणि निवासी संपादक अशा विविध पदांवर काम केलं आहे. याशिवाय काही फिचर वेबसाईटसाठीही त्याने लिखाण केलं आहे.

Latest News