शाहू, फुले, आंबेडकर यांचा केवळ उल्लेख करून चालणार नाही तर मानसिकता तयार करायची गरज

मुंबई: ‘जी विचारधारा घेऊन सामूहिक कष्ट केले त्या सर्वांचा सन्मान इथं केला गेला आहे. जी विचारधारा स्वीकारली त्या रस्त्यानं जाण्याचा प्रयत्न करणं हे आगामी पिढीला देखील प्रोत्साहन देणे महत्त्वाचे ठरणार आहे, शेवटच्या माणसाच्या जपणुकीसाठी काम करावं’ असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.
शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरमध्ये ‘8 दशके कृतज्ञतेची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मोजक्याच नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शरद पवार यांनी सर्व नेते, मंत्री, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
‘जी विचारधारा घेऊन सामूहिक कष्ट केले त्या सर्वांचा सन्मान इथं केला गेला आहे. जी विचारधारा स्वीकारली त्या रस्त्यानं जाण्याचा प्रयत्न करणं हे आगामी पिढीला देखील प्रोत्साहन देणे महत्त्वाचे ठरणार आहे. 50-55 वर्ष सर्वांच्या समवेत काम करण्याची संधी जनतेनं दिली. त्या काळातील गांधी-नेहरूंचे विचारांचा प्रभाव होता. त्यानुसार कामं केली. कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे ही आईची शिकवण होती, तिचा दृष्टीकोन महत्त्वाचा होता’, असं शरद पवार म्हणाले.

तसंच, आज शाहू, फुले, आंबेडकर यांचा केवळ उल्लेख करून चालणार नाही तर मानसिकता तयार करायची गरज आहे. फुले यांनी आधुनिकतेची कास धरली, फुल्यांना महात्मा मानतो कारण त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला भक्कम घटना दिली. आंबेडकर यांनी विज्ञानाचा आधार घेतला. आधुनिकता आणि विज्ञानाच्या दिशेने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गेलं पाहिजे. नवी पिढी काम करत आहे, यामार्फत देश आणि राज्य उभं राहतं, याची संधी तुमच्यामुळे मिळाली आहे, असंही यावेळी पवार म्हणाले.
दरम्यान, आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाल्याचा भावूक क्षण पाहण्यास मिळाला.