राज्यातील कलाकेंद्र सुरु करण्यास परवानगी

LAVANI-MAHARASHTRA

सोलापूर: कोरोना आणि लॉकडाऊनमुळं गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेल्या कलाकेंद्रांमध्ये आता पुन्हा एकदा ढोलकीवर थाप आणि घुंगराची छनछन ऐकायला मिळत आहे. त्यामुळं माढा तालुक्यातील मोडनिंब गावच्या लावणी कलाकेंद्रात राज्यभरातील रसिक प्रेक्षकांचे पाय आता वळू लागले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव, केंद्र आणि राज्य सरकारने घातलेले निर्बंध यामुळे गेली आठ महिने राज्यातील सर्व कलाप्रकार बंदच होते. त्यात महाराष्ट्राची ओळख असलेली लावणीही बंद होती. त्यामुळे कलाकेंद्रातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती.

राज्य सरकारने काही नियमावली तयार करुन राज्यातील कलाकेंद्र सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कलाकेंद्रातील कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर लावणीचा खास प्रेक्षकवर्गही आता चांगलाच सुखावला आहे. त्यामुळे मोडनिंबच्या कलाकेंद्रांवर आता रसिक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर रसिकांचा वाढता ओघ पाहून लावणी कलावंतही नव्या जोमानं आपली कला सादर करत आहेत. ढोकलीवरील थाप आणि घुंगराची छनछन कानी पडल्यानंतर प्रेक्षकही आनंदाने घरची वाट धरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आलेले हे लावणी कलांवत पोटाळी खळगी भागवण्यासाठी शेतात रोजंदारीवर जात असल्याचं चित्रही पाहायला मिळालं. राज्य सरकारनं काही मदत देऊ केली असली तरी त्यात दोन वेळच्या जेवणाचीही सोय होत नव्हती. त्यामुळे अनेक कलावंतांनी तर हा व्यवसाय कायमचा सोडून दुसरा मार्ग पत्करला. पण अखेर सरकारनं कलाकेंद्रांना परवानगी दिल्यामुळे हे कलावंत आता पुन्हा एकदा आपली कला जोमाने सादर करताना दिसत आहेत.

“आम्ही चाळ बांधतोय… पण तुम्ही येणार ना?”

येत्या 2 जानेवारीपासून बालगंधर्व रंगमंदिर इथं लावणीचा दहा महिन्यानंतरचा पहिला प्रयोग होणार आहे. त्यामुळे लावणी कलावंताध्ये उत्साह संचारला आहे. “आम्ही चाळ बांधतोय… पण तुम्ही येणार ना”, अशी साद लावणी कलावंतांनी व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांना घातली आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा हा लावणी कलावंतांसाठी सुगीचा काळ यंदा कोरोनामुळं वाया गेला. मात्र आता 50 टक्के क्षमतेनं नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे लावणी कलावंतांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्यांची दाद ऐकण्यासाठी कलाकारांचे कान आसुसले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी लावणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जुन येण्याची विनंती आयोजक तसेच कलावंतांकडूनही होत आहे.

Latest News