शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसणार- अण्णा हजारे


अहमदनगर | शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसणार, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारला दिला आहे. यासंदर्भात अण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
काही दिवसांपूर्वीच दिल्लीत सुरु असलेलं हे आंदोलन देशव्यापी झालं पाहिजे, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं होतं. आता त्यांनी थेट उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. गेल्या 16 दिवसांपेक्षा जास्त काळ पंजाब आणि हरयाणामधल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. कृषी कायदे रद्द केले जावेत ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. ऐन थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान, दिल्ली-हरयाणाच्या सीमेवर हे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला आहे.