प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा


मुंबई | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे मेट्रोच्या कामावर काही परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो 3 चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का?, या पर्यायाची पडताळणी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
‘मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक’, अशी टीका शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, “मेट्रोला गिरगावात विरोध केला मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढेच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर. प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच!”
दरम्यान, आता मेट्रो कारशेड उभारण्यापेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये, असा डाव आखला जात असल्याचा आरोपही शेलारांनी केला आहे.