निवडणूक येता येता तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी या एकट्या राहतील – केंद्रीयगृहमंत्री अमित शाह


कोलकाता : निवडणूक येता येता तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी या एकट्या राहतील, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. ते पश्चिम बंगाल (West Bengal) दौऱ्यातल्या कार्यक्रमात बोलत होते. टीएमसी खासदार सुनील मंडल, सुवेंदू अधिकारी यांनी शहांच्या हजेरीत भाजपत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.
तृणमूल काँग्रेसच्या सहा, डाव्या पक्षाच्या तीन आणि काँग्रेसच्या एका आमदाराने आज भाजपचे कमळ हाती घेतले. पुढच्या वर्षी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका आहेत. मात्र भाजपेन २०० आमदार निवडून आणण्याचे मिशन ठेवले आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींना सहा आमदार खासदारांनी आत्ताच रामराम ठोकला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या अनेक स्थानिक पक्षांनाही गळती लागली आहे
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीआधी भाजपने पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान भाजपाने तृणमूल काँग्रेसविरोधात एल्गार पुकारला. आज सर्व पक्षांतील चांगले लोक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपमध्ये आले आहेत. ही तर सुरूवात झाली आहे. निवडणूक येईपर्यंत ममतादीदी तुम्ही एकट्याच राहाल, असे ते म्हणाले.
सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमचे चांगले लोक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पक्षात आले आहेत. ममता दीदी मी आठवण करून देऊ इच्छितो की, जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूल पक्ष बनवला, ते पक्षांतर नव्हते का?, असा सवाल शाह यांनी त्यांना केला.