पुणे शहरातील आता वाहन चालकांना डावीकडे वळण घेता येणार

pmc-a

पुणे : – पुणे शहरातील चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘लेफ्ट हॅन्ड फ्री’ असावा असा प्रस्ताव काँग्रेसचे नगरसेवक अ‍ॅड. भैय्यासाहेब जाधव आणि शिवसेनेचे नगरसेवक अविनाश साळवे यांनी समितीसमोर ठेवला होता. समितीने हा प्रस्ताव मंजूर केल्याने आता वाहन चालकांना डावीकडे वळण घेता येणार आहे.

सिग्नलला उभे राहिल्यानंतर डावीकडे वळण घेणाऱ्या वाहनचालकांनाही विनाकारण चौकात थांबावे लागते. त्यामुळे इंधन आणि वेळ याचा अपव्यय तर होतोच शिवाय वाहनांची वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सिग्नलला वाहनचालकांना डावीकडे वळण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंजूर केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. या प्रस्तावाला मुख्यसभेने मंजूरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शहरातील अनेक चौक अरुंद आहेत. तसेच या चौकांना जोडणाऱ्या रस्त्यांची रुंदीही कमी आहे. त्यातच चौकाचौकात अतिक्रमणे वाढत चालल्याने रस्ते आणखीनच अरुंद झाले आहेत. त्यामुळे सिग्नल लागताच वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे ज्यांना डावीकडे वळायचे आहे त्यांना वळता येत नाही. जर डावीकडे वळणाऱ्या वाहन चालकांना न थांबता थेट परवानगी दिली तर वाहतुक कोंडी 33 टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे जगताप यांनी सांगितले.

दिल्ली, चंदीगड, बंगळुरू इत्यादी मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक चौकात डावीकडे थेट वळण्यास परवानगी आहे. या शहरांमधील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. या शहरांप्रमाणेच पुणे शहरातील प्रत्येक चौकात वाहन चालकांना डावीकडे वळण घेण्यास परवानगी देणारा प्रस्ताव शहर सुधारणा समितीने मंजूर केला आहे.

Latest News