पुणे महापालिकेस 23 गावांच्या विकासासाठी लागणारा निधी राज्य सरकारने द्यावा?


पुणे : पुणे शहराच्या हद्दीलगत असलेली 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारने बुधवारी (दि. 23) प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता पुणे महापालिका राज्यातील सर्वाधिक मोठ्या क्षेत्रफळाची महापालिका ठरली आहे.
दरम्यान, पुणे महापालिका हद्दीत शहरालगतची २३ गावे समाविष्ट करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने शिक्कामोर्तब केले आहे मात्र ही गावे महापालिका हद्दीतील भाग बनावी की नाही, याकरिता हरकती व सूचना (आक्षेप) दाखल करण्यास पुढील एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.
मागीलवर्षी राज्यात पुन्हा सत्ता बदल झाल्यानंतर उर्वरीत २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार राज्य शासनाने यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. २३ गावांचा महापालिकेमध्ये समावेश झाल्यास पुणे महापालिकेची भौगोलिक हद्द ही ४५० कि.मी. पेक्षा अधिक होणार आहे.
दरम्यान, या निर्णयाबाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले महापालिका हद्दीत २०१७ मध्ये ज्या ११ गावांचा समावेश महापालिका हद्दीत झाला आहे, त्या गावांचा विकास आराखडा अद्याप तयार झालेला नाही़ या गावांमध्ये पायाभूत सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत़ त्यामुळे नव्याने २३ गावे घेताना ती टप्प्या-टप्प्याने घ्यावी अशी आमची भूमिका होती़ पण आता राज्य शासनाने एकत्रित २३ गावे घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यास अनुसरून या २३ गावांच्या विकासासाठी लागणारा ९ हजार कोटी रूपयांचा निधी राज्य शासनानेच पुणे महापालिकेस द्यावा अशी मागणी मोहोळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.
तर दुसऱ्या बाजूला आता या मुद्द्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. राज्य सरकारने 23 गावांचा पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबतचा घेतलेला निर्णय हा घाईगडबडीत आणि राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेवून घेतला आहे, असा आरोप आ.चंद्रकांत पाटील यांनी केला. गोंधळलेल्या राज्य सरकारने आज घाईगडबडीत ही अधिसू्चना काढून या गावातील नागरिकांच्या अपेक्षा धुडकावून लावल्या आहेत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
समाविष्ट होणारी २३ गावे
म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे – धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नर्हे, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी,वाघोली.