कोंढव्यात गेल्या 4 वर्षात वेगाने बेकायदेशीर बांधकामांचा धडका

slums-2100

महापालिका निवडणुकीनंतर कोंढव्यात अनधिकृत बांधकामांना वेग कोंढव्यात गेल्या चार वर्षात वेगाने बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट झाला असून असंख्य तक्रारी असतानाच महापालिका केवळ काही सिलेक्टीव्ह ठिकाणी कारवाईचा देखावा करत आहे. सर्व्हे नं. ४६ येथील बेकायदा बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बांधकाम व्यावसायिक समर सैय्यद, असीम शेख, दानिश कुडिया यांचे ७ गुंठे जागेवर अनधिकृतपणे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे तेथील सोसायट्यांचा रस्ता, बंद होत असून हवा जाण्यासाठीही जागा उरली नसल्याचे दिसून येते. या सोसायटीच्या सभासदांनी नगरसेवक, महापालिका अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या अतिक्रमण विभागाकडे पोलिसांचे अख्ख पथक दिले असतानाही पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण देऊन कारवाईला टाळाटाळ करताना दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीनंतर कोंढव्यात अनधिकृत बांधकामांना वेग आला.शिवनेरीनगर, साईबाबानगर, भाग्योदयनगर, नावाजीश पार्क, गल्ली नंबर १ ते ३१, कोंढवा सर्व्हे नं. ४६, ४२, जे. के.पार्क, मलिकनगर, ५ नंबर, सर्व्हे नं . १५ , साई सर्व्हिसच्या मागील इमामनगर अशा अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे राजरोजपणे उभी रहात आहेत. त्यामुळे ज्या सोसायट्या यापूर्वी महापालिकेच्या सर्व परवानग्या घेऊन उभ्या राहिल्या आहेत. त्यांचे रस्ते, पाणी, वीज असे प्रश्न दिवसेंदिवस उग्र होऊ लागले आहेत. मात्र, या सर्व बेकादेशीर बांधकामांकडे महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. नगरसेवक साईनाथ बाबर यांनी सोसायटीचे सभासद व नुराणी कब्रस्तान ट्रस्ट व कार्यकर्त्यांना घेऊन मनपा आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन सर्व्हे नं. ४६ मधील बेकायदेशीर बांधकामाबाबत पत्र देऊन कारवाईची मागणी केली. आयुक्तांनी दोन दिवसात कारवाई होईल, असे आश्वासन दिले. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. याबाबत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, महापालिकेच्या अतिक्रमण विभागासाठी पोलीस निरीक्षकांसह मोठा फौजफाटा कायमस्वरुपी दिलेला असतो. बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यासाठी त्यांनी हे मनुष्यबळ वापरणे अपेक्षित असते. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर, त्यावेळी स्थानिक पोलीस ठाण्यातून अतिरिक्त बंदोबस्त वेळोवेळी पुरविला जातो. महापालिकेने कारवाईसाठी दिलेल्या पोलीस दलाचा अगोदर वापर केला पाहिजे, त्यानंतरच गरज असेल तर अधिकचा बंदोबस्त मागवावा. या एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या प्रकारामुळे अनधिकृत बांधकामांवर कोणतीही ठोस कारवाई मात्र होताना दिसत नाही

Latest News