भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संजय काकडेंची नियुक्ती


पुणे | प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी संजय काकडे यांना पत्र पाठवलं आहे. आपण गत काळात राज्यसभेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेलं कार्य तसेच संसदेतील आपलं उल्लेखनीय कार्य अभिनंदनीय आहे. आपल्या राजकीय व सामाजिक कार्याचा तसेच जनसंपर्काचा उपयोग पक्ष संघटन वाढीसाठी निश्चितपणे होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. आपल्या आगामी कारकीर्दीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! अशा आशयाचं पत्र चंद्रकांत पाटील यांनी संजय काकडे यांना पाठवलं आहे.राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांच्याकडे भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. संजय काकडेंची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काकडेंच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.कुख्यात गुन्हेगार गजा मारणे रॅली प्रकरणात माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर शिवाजीनगर सत्र न्यायालयानं संजय काकडे यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला गेला होता.दरम्यान, 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर संजय काकडे भाजपसोबत गेले होते. त्यामुळे त्यांना भाजपचे सहयोगी खासदार म्हणून ओळखले जाते. मात्र दुसऱ्यांदा भाजपकडून काकडे यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली नाही. त्यावेळी काकडे यांची उघडउघड नाराजी लपून राहिली नव्हती.