हमास दहशतवाद्यांचे पंधरा किलोमीटरचे बोगदे इस्रायलच्या लष्कराने उद्ध्वस्त

images-2021-05-18T094903.871

गाझा शहर : इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे, की उत्तर गाझात हमास कमांडर्सच्या नऊ घरांवर हल्ले करण्यात आले. काही भागात आयसिसचे नियंत्रण असून तेथे हे हल्ले करण्यात आले. अलीकडे इस्रायलने हमासचा नेता येहीय सिनवर याच्यासह अनेकांच्या घरांवर हल्ले केले आहेत. हमासने त्यांचे वीस जण मारले गेल्याची कबुली दिली असली तरी इस्रायलने हमासचे दोन डझनाहून अधिक कमांडर्स मारल्याची छायाचित्रे दिली आहेत.गाझा पट्टय़ात सोमवारी सकाळी मोठय़ा प्रमाणात हवाई हल्ले करून हमास दहशतवाद्यांचे पंधरा किलोमीटरचे बोगदे उद्ध्वस्त केले असून अनेक हमास कमांडर्सची घरे जमीनदोस्त केली आहेत, असा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. लष्कराने ३५ ठिकाणी हल्ले केले असून त्यात बहुतांश बोगद्यांचा समावेश होता. संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न चालू असले तरी इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी रविवारी हल्ले सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. हमासचा परदेशात असलेला प्रमुख नेता इस्माइल हनिया याने म्हटले आहे, की अमेरिका, रशिया, इजिप्त, कतार या देशांनी शस्त्रसंधीसाठी आमच्याशी संपर्क केला होता, पण पॅलेस्टिनी लोकांचे हित धोक्यात घालून कुठलाही तोडगा आम्ही स्वीकारणार नाही. हा संघर्ष लवकरात लवकर संपावा अशी अपेक्षा इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनी व्यक्त केली आहे.

गाझा पट्टय़ात रात्री मोठय़ा प्रमाणावर हवाई हल्ले करण्यात आले. आठवडाभरापासून सुरू झालेल्या संघर्षांतील सर्वात मोठे हल्ले  इस्रायलने सोमवारी केले. रविवारी करण्यात आलेल्या हल्ल्यात एकूण तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून ४२ जण ठार झाले आहेत. इस्रायल व हमास यांच्यात गाझा पट्टय़ात संघर्ष सुरू आहे. सोमवारच्या हल्ल्यात नेमके किती ठार झाले हे अजून समजलेले नाही. गाझा पट्टय़ातील हवाई हल्ल्यात एक तीन मजली इमारत कोसळली आहे. पण हल्ल्याच्या दहा मिनिटे आधी इस्रायलने त्याबाबत पूर्वसूचना दिली होती. शेतांमध्येही हवाई हल्ले मोठय़ा प्रमाणात झाले आहेत.

गेल्या सोमवारपासून हमास दहशतवादी व इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. हमासने एक लांब पल्ल्याचा अग्निबाण जेरुसलेममध्ये टाकला. ऐन रमझानच्या महिन्यात हा संघर्ष झाला असून पॅलेस्टिनी कुटुंबांना यहुदींकडून घरे सोडण्यास भाग पाडले जात आहे. इस्रायली लष्कराने अनेक हवाई हल्ले केले असून हमासच्या पायाभूत सुविधा भेदण्यात त्यांना यश आले आहे. पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये ३१०० अग्निबाण सोडले असून आतापर्यंत १९८ पॅलेस्टिनी लोक ठार झाले, त्यात ५८ मुले व ३५ महिला यांचा समावेश आहे. एकूण १३०० लोक जखमी झाले आहेत. गाझामध्ये सोडण्यात आलेल्या अग्निबाणामुळे एक पाच वर्षांचा मुलगा व सैनिक यांच्यासह इस्रायलचे आठ जण ठार झाले आहेत.गाझातील आपत्कालीन मदत अधिकारी  समीर अल खतिब यांनी सांगितले, की असा विध्वंस १४ वर्षांत कधी पाहिला नव्हता. २०१४ मध्येही असे घडले नव्हते एवढी हानी झाली आहे.

गाझाचे महापौर याह्य़ा सराज यांनी अल जझिरा वाहिनीला सांगितले, की हवाई हल्ल्यांनी रस्ते व पायाभूत सुविधांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आ हे. जर आक्रमण चालूच राहिले तर आमची परिस्थिती यापेक्षा वाईट होईल. संयुक्त राष्ट्रांनी असा इशारा दिला की, या भागातील सौर ऊर्जा केंद्राचे इंधन संपण्याच्या मार्गावर आहे. महापौर सराज यांनी म्हटले आहे, की गाझामध्ये आता सौर ऊर्जेसाठी लागणारे सुटे भाग नाहीत. रोज ८ ते १२ तास वीज बंद राहत असून पिण्याचे पाणीही योग्य राहिलेले नाही. विद्युत वितरण कंपनीचे प्रवक्ते महंमद थाबेट यांनी सांगितले, की गाझा वीज केंद्राचे इंधन संपत आले असून दोन ते तीन दिवसच वीज पुरवठा करता येईल. हवाई हल्ल्यात वीज वाहिन्या तुटल्या आहेत. हल्ल्यांमुळे दुरुस्तीसाठी कर्मचारी जाऊ शकत नाहीत.

Latest News