पिंपरी चिंचवड शहरातील लसीकरण आजपासून पुन्हा सुरू…

पिंपरी ::-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत होती. परंतु, गेल्या आठवड्यापासून रुग्ण संख्या अडीच हजारावरून थेट सहाशेवर आली असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तीन दिवसानंतर शहरातील १६ लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जात आहे.

तर, ५० लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जात आहे.हे सर्व लसीकरण ४५ वर्षापुढील वयोगटातील आहे. दरम्यान, शहरातील संख्या आटोक्यात येत असली, तरी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास लवकरच शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरावर येईल यात शंका नाही, असा आशावाद प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे

.पिंपरी-चिंचवड शहरात तीन दिवसानंतर आज लसीकर सुरू झालं आहे. सध्या शहरातील बाधित रुग्णांची आकडेवारी सहाशेवर आलेली आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून शहरातील लसीकरण ठप्प होतं ते आज पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

पिंपरीत करोनास्थिती सुधारली

वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर असलेला कमालीचा ताण आता निवळताना दिसतो आहे. दररोजच्या करोनाबाधितांची संख्या वेगाने कमी होत असून उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय रीत्या वाढलेली आहे. रेमडेसिविर आणि प्राणवायूचा तुटवडा तूर्तास जाणवत नाही. कृत्रिम श्वसनयंत्रणा सज्ज खाटांची मागणी असली, तरी त्या उपलब्ध होत आहेत. मृत्यूची संख्या कमी झालेली असली, तरी सध्याची आकडेवारी चिंता निर्माण करणारी आहे.

“करोना रुग्णांची संख्या कमी होते आहे. पालिका रुग्णालये तसेच करोना केंद्रांमधील खाटा मोठ्या प्रमाणात रिकाम्या आहेत. प्राणवायू खाटा तसेच कृत्रिम श्वसनयंत्रणा सज्ज खाटाही उपलब्ध होत आहेत. रेमडेसिविरची कमतरता नाही. प्राणवायूचा तुटवडा नाही. अशी दिलासादायक परिस्थिती असली, तरी यापुढेही नागरिकांनी काळजी घेतलीच पाहिजे. बरे होऊन गेलेल्या रुग्णांनीही गाफील न राहता खबरदारी घेतली पाहिजे,” असं पिंपरीच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी म्हटलं आहे.

Latest News