महापालिकेने कष्टकऱ्यांच्या तोंड़ाला पाने पुसण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करू- कष्टकरी संघर्ष महासंघ


पिंपरी चिंचवड | राज्य शासनाची पंधराशे रुपयांची मदत मिळाली. तुमची तीन हजार रुपयांची मदत कधी देणार, असा सवालही या कष्टकऱ्यांनी महापालिकेला केला आहे.कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज, शनिवारी कोरोना नियमांचे पालन करत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, महादेव शेंडगे, जय राठोड, मनीषा मिरपगार, पार्वती हळनोर आदी उपस्थित होते.यावेळी नखाते म्हणाले, टाळेबंदीमध्ये कष्टकरी कामगारांना दिलासा म्हणून राज्य शासनाने 5476 कोटी रुपये अर्थसहाय्य जाहीर केले आणि त्यानुसार अनेक कष्टकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. यात शहरातील फेरीवाला, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, रिक्षाचालक यांचा समावेश आहे.टाळेबंदीमध्ये राज्य शासनाने मदत जाहीर केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी शहरातील कष्टकऱ्यांना तीन हजार रुपये देणार असल्याचे जाहीर केले व मोठी प्रसिद्धी मिळवली. राज्यात असा लाभ देणारी एकच महापालिका असा तोराही मिरवला. मात्र, महापालिकेने ‘यू-टर्न’ घेत लाभ देता येणार नसल्याची भूमिका घेतली. अशी लबाडी करुन कष्टकऱ्यांच्या तोंड़ाला पाने पुसण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा कष्टकरी वर्गाने आज दिला.कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये मदतीसाठी सत्ताधारी आणि महापालिकेने जो निर्णय घेतला तो अंतिम ठरवावा. अनेक गोष्टी ज्या नियमात आहेत त्याही आणि नियमात नसणाऱ्यांही प्रशासन आणि सत्ताधारी मिळून नियमात बसवत असतात. यातून अनेक प्रकल्प राबवित असतात. त्यामुळे कष्टकऱ्यांना जो लाभ द्यायचा तो नियमांमध्ये बसवून द्यावा, त्यांना आशा दाखवून त्यांच्या तोंडाला पाने पुसू नये.महापालिकेने फेरीवाले, गटई कामगार, रिक्षाचालक, कलाकार, घरेलू कामगार यांना ३० एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत दुर्बल प्रत्येकी तीन हजार रुपये मदत करण्याचा ठराव करण्यात आला. मात्र वेगवेगळी कारणे देऊन यामध्ये यू-टर्न घेतला जात आहे. आता वेगवेगळी कारणे दाखवून शहरातील कष्टकरी व गरीब कामगारांना दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.मात्र, शहरातील कष्टकरी वर्ग अशा वर्तणुकीला माफ करणार नाही. द्यायचे नाही तर बोलायचे नाही. बोलले तर लाभ दिलाच पाहिजे. त्यामुळे जाहीर केलेली मदत लवकर द्यावी ; अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा नखाते यांनी यावेळी दिला.