Obc:26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहोत- पंकजा मुंडे


पुणे | राज्य सरकारनं वेळेत कागदपत्र सादर न केल्यामुळं हे आरक्षण धोक्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्रातून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन ओबीसी विषयावर चर्चा आणि भूमिका ठरवली होती. वेळ देऊनही सरकारकडून वेळकाढूपणा केला जातोय. मराठा समाजाला आरक्षण देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. मात्र ओबीसीला तर आता आम्ही मिळवून देऊच. अशी भूमिका घेत आरक्षण रक्षणार्थ रस्त्यावर उतरणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. तसेच राज्य सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.सर्वोच न्यायालयानं घेतलेल्या निर्णयामुळं ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राज्यव्यापी ओबीसी आरक्षण बचाव बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकार परिषदेत ओबीसींच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं.ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात येणं, हा विषय अत्यंत संतापजनक आहे. त्यामुळे येणाऱ्या 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहोत. न्याय मिळाला नाही तर यापेक्षा मोठा लढा देऊ. विधानसभा आणि मंत्री हा प्रश्न सोडवू शकतात. ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होऊ देणार नाही. राज्य केंद्राला जबाबदार धरत असेल तर राज्य सरकारचा अभ्यास कमी आहे, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, वंचितांचं सध्या कुणीच वाली नसल्याची टीका देखील पंकजा यांनी यावेळी केली. आज मुंडे साहेब असते, तर ते रस्त्यावर उतरले असते अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. या बैठकीला महापौर माई ढोरे, आमदार महेश लांडगे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.