पिंपरी-चिंचवडमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर पूर्णतः माफ करा – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी-चिंचवडमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर पूर्णतः माफ करा – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ताकर पूर्णतः माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौर राहुल जाधव यांच्याकडे केली आहे.आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौर राहुल जाधव यांना पत्र दिले आहे.  त्यामध्ये म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाने शहरातील नागरिकांना सुखकर सुविधा देण्याचे वचन दिले. नागरिकांनीही निवडणुकीत भाजपला भरभरून साथ दिली आणि महापालिकेत पक्षाची एकहाती सत्ता आली. सत्तेत आल्याने शहरातील नागरिकांना निवडणुकीवेळी दिलेली सर्व वचने पूर्ण करणे हे पक्षाचे कर्तव्य आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त सुखकर सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेमार्फत महत्त्वाचे निर्णय व्हावेत. त्यानुसार शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ताकर पूर्णतः माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा.पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांमध्ये सर्वसामान्य कुटुंबे राहतात. अशा कुटुंबांनी रोजच्या जगण्यातून पै-पै जमवून आपल्या घरांचे स्वप्न कसे-बसे पूर्ण केलेले असते. अनेकजण ५०० चौरस फुटांच्या घरासाठी विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून आयुष्यभर हे कर्ज फेडत असतात. अशा नागरिकांना करातून दिलासा मिळाल्यास त्यांना आपले कुटुंब जगवणे काहीसे सुखकर होईल. त्यासाठी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर पूर्णतः माफ करावे लागणार आहे. त्यानुसार महापालिकेमार्फत हा धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.