ध्येय प्राप्तीसाठी जिद्द चिकाटी आवश्यक – डॉ. डी. के. बंदोपाध्याय

पिंपरी, ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- पुणे (दि. १२ सप्टेंबर २०२३) प्रवाहाच्या विरुध्द जाऊन यश मिळवायचे असेल तर आपल्या ध्येयाप्रती सखोल अभ्यास, प्रचंड आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द असली पाहिजे. तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल, असे मार्गदर्शन गुरू गोविंदसिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू डॉ. डी. के. बंदोपाध्याय यांनी केले.
साते, मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयु) २०२३-२४ शैक्षणिक वर्षाचा प्रथम ‘दीक्षारंभ’ विद्यार्थी स्वागत समारंभ मुख्यालयात नुकताच आयोजित केला होता. त्यावेळी डॉ. बंदोपाध्याय यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्लोबल वेलनेस चे ॲम्बेसेडर डॉ. रेखा चौधरी, आयआयएम काशीपूरचे प्रा. के. एम. भारुल इस्लाम, येस बँकेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष ममता कौशल, स्टुडिओ 34 डिझाइन ॲण्ड आर्ट प्रा. लि. संस्थापक संचालक अभिजीत भोगे, कुलसचिव डॉ. राजीव भारद्वाज, प्रबंधक डॉ. डी.एन. सिंग आदी उपस्थित होते.
इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आपल्याला यशाकडे घेऊन जाते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्नं पाहण्याचे धाडस केले पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे रेखा चौधरी यांनी सांगितले.
फक्त नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास करू नका, तर उत्तम कौशल्य विकसित करण्यासाठी अभ्यास करा. संपादन केलेले ज्ञान आणि कौशल्य आयुष्यभर सोबत राहतील, असे ममता कौशल म्हणाल्या.
कठोर परिश्रमाला पर्याय नाही. केवळ मेहनत आणि झोकून दिल्यास यशाच्या शिखरावर पोहोचता येईल, असे अभिजित भोगे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्त करण्यासाठी दररोज किमान एक नवीन गोष्ट शिकली पाहिजे. त्यामुळे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी उपयोग होईल असा सल्ला प्रा. के. एम. भारूल इस्लाम यांनी दिला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सूत्रसंचालन प्रा. अबोली निफाडकर, डॉ. शिल्‍पी बोरा यांनी केले. स्वागत डॉ. राजीव भारद्वाज आणि आभार डॉ. डी. एन. सिंग यांनी मानले.

Latest News