पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी जनतेचा आक्रोश: उपसभापती अण्णासाहेब बनसोडे यांच्या अवमानाविरुद्ध तीव्र निषेध मोर्चा


दिनांक: 11 ऑगस्ट 2025 – (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड, पुणे: महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. अण्णासाहेब बनसोडे यांचा आयुक्तांकडून झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात 5000 पेक्षा अधिक आंबेडकरी कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित नागरिक सहभागी झाले. मोर्चाची सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यापासून झाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभेने त्याची सांगता झाली.
आयुक्तांवर सात दिवसांत कारवाईचा इशारा
निषेध सभेत आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी एकमुखाने आयुक्तांवर सात दिवसांत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत कारवाई न झाल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला टाळा ठोकण्याचे आंदोलन तीव्र करण्याचा गर्भित इशारा देण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत यांनी भूषवले. यावेळी रिपब्लिकन चळवळीचे नेते सुरेश निकाळजे,कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे ,रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारी, पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, सोलापूर येथून आलेले दशरथ कसबे, संतोष निसर्गंध, धर्मपाल तंत्रपाळे, कुणाल वावळकर, प्रतीक कर्डक,अजित भाई शेख, बाळासाहेब रोकडे, विजय डोळस, संदिपान झोंबाडे, ज्ञानेश्वर कांबळे, गंगा धेंडे, सुप्रिया काटे, सिकंदर सूर्यवंशी, अंजना गायकवाड यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बनसोडे कुटुंबियांचा आभार
बनसोडे कुटुंबातर्फे सिद्धार्थ बनसोडे यांनी व्यासपीठावर उपस्थित राहून मोर्चेकरांचे आभार मानले. “आंबेडकरी जनतेने अण्णांसाठी दाखवलेले प्रेम आणि समर्थन आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी कायम कटिबद्ध राहू,” असे त्यांनी भावनिक उद्गार काढले.
कायदेशीर कारवाईसाठी तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय अवसरमल यांनी याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाईसाठी पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला. मोर्चेकरांचे निवेदन पोलीस उपायुक्त श्री. संदिप आटोळे, सह्या पोलीस आयुक्त श्री. हिरे साहेब यांनी स्वीकारले.
आंबेडकरी चळवळीचा भावनिक आणि कायदेशीर लढा
हा मोर्चा आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी भावनिक आणि कायदेशीर पद्धतीने आयोजित केला होता. समाजातील अन्याय आणि अपमानाविरुद्ध एकजुटीने लढण्याचा संदेश या मोर्चाने दिला. आंबेडकरी विचारधारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांवर आधारित हा लढा पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
संपर्क:
( संपर्क: संजय अवसरमल, राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय विभाग, पिंपरी चिंचवड मो 9561094059]