पशुवैद्यकीय विभागातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांचे वेतन थकविण्याबाबत चौकशीची मागणी, नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन

sandip-waghere

पिंपरी प्रतिनिधी – (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागांतर्गत पशुरुग्णालय, प्राणीसंग्रहालय तसेच विविध प्रक्षेत्रांमध्ये आवश्यक कामकाजासाठी मे. साई एजन्सी या ठेकेदारामार्फत पशुशल्यचिकित्सक, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यक, क्यूरेटर तसेच इतर पैरावेट स्टाफ व कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंग पद्धतीने नेमणूक करण्यात आलेली आहे.

मात्र अत्यंत गंभीर बाब अशी समोर आली आहे की सदर मे. साई एजन्सीने मागील दोन महिन्यांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केलेले नाही. त्यामुळे संबंधित कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. यासंदर्भात अनेक कर्मचारी व कामगारांकडून नगरसेवक संदीप वाघेरे यांच्याकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

याव्यतिरिक्त, सदर संस्थेकडून कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी (PF) तसेच इतर आवश्यक कागदपत्रांबाबत खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती सादर करून विभागाकडून बिले उचलल्याचा गंभीर प्रकार घडल्याची माहितीही समोर आली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून शासन तसेच कामगार दोघांचीही फसवणूक करणारा असल्याचे वाघेरे यांनी नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी निवेदन देत या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशीअंती सदर प्रकरणात दोषी आढळल्यास मे. साई एजन्सी या ठेकेदारास तात्काळ काळ्या यादीत (Blacklist) समाविष्ट करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणात संबंधित संस्थेला मदत करणारे किंवा दुर्लक्ष करणारे जबाबदार अधिकारी व कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी ठाम मागणीही नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

कामगारांवर अन्याय होणार नाही यासाठी महानगरपालिकेने तातडीने योग्य ती कारवाई करावी, असेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Latest News