करवाढीच्या प्रस्तावाविरोधातील लढ्याला यश!नगरसेवक विकास साने यांच्या पाठपुराव्यामुळे ‘क वर्ग ते अ वर्ग’ प्रस्ताव दप्तरी जमा

पिंपरी, दि. १५ जून :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील चिखली, मोशी, डुडुळगाव आणि चऱ्होली या भागांना करप्रणालीत “क वर्गातून अ वर्गात” समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाविरोधात नगरसेवक विकास नामदेव साने यांनी उभारलेल्या ठाम लढ्याला अखेर यश मिळाले असून महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव दप्तरी जमा केला आहे. त्यामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना संभाव्य करवाढीपासून मोठा दिलासा मिळाला आहे.
दिनांक ५ मे २०२६ रोजी झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक विकास साने यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला होता. नागरिकांना अद्यापही अपेक्षित मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसताना त्यांच्यावर अतिरिक्त कराचा बोजा टाकणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले होते.
यावेळी बोलताना त्यांनी महापालिकेतील अनावश्यक खर्च आणि आर्थिक अपव्ययावरही बोट ठेवले. कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती, विविध विभागांतील अनावश्यक खर्च आणि निधीच्या योग्य नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. “प्रथम नागरिकांना दर्जेदार सुविधा द्या, अपव्यय थांबवा आणि त्यानंतरच करवाढीचा विचार करा,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी सभागृहात मांडली होती.
साने यांच्या या आक्रमक भूमिकेला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून संबंधित प्रस्ताव दप्तरी जमा करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना नगरसेवक विकास नामदेव साने म्हणाले, “चिखली, मोशी, डुडुळगाव आणि चऱ्होली परिसरातील नागरिकांवर अन्यायकारक करवाढ लादण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा न देता करवाढ करणे योग्य नव्हते. हा विजय माझा नसून या भागातील सर्व नागरिकांचा आहे. नागरिकांच्या हिताविरुद्ध जाणारा कोणताही निर्णय आम्ही खपवून घेणार नाही. भविष्यातही सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी माझा संघर्ष असाच सुरू राहील.”
महापालिका प्रशासनाने प्रस्ताव दप्तरी जमा केल्याने विकास साने यांच्या भूमिकेला बळ मिळाले असून नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
