आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शहराचा विभागनिहाय आराखडा तयार करणार-आयुक्त डॉ.सूर्यवंशी

नाल्यांचा नैसार्गिग प्रवाह रोखणाऱ्यांवर करणार कारवाई
पिंपरी, दि. ८ जुलै २०२६ :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड शहरात उद्भवणाऱ्या पूरस्थितीसह कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी शहराच्या भौगोलिक रचनेचा, नैसर्गिक नाल्यांचा, पर्जन्यमानाचा तसेच वातावरणीय बदलांचा सखोल अभ्यास करून विभागनिहाय सर्वंकष आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. तसेच नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अडविणारे अतिक्रमण अथवा अडथळे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण झालेल्या पूर व पाणी साचण्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रम बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंते मनोज सेठिया, अजय सूर्यवंशी, अनिल भालसाकळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपायुक्त प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकत्याच उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, अशा प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीतून प्रशासनाला महत्त्वाचे धडे मिळतात. त्या अनुभवांच्या आधारे भविष्यातील नियोजन अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या कार्यपद्धतीतील उणिवा दूर करून समन्वयाने कार्य करावे.
बैठकीत साधनसामग्रीची उपलब्धता, मनुष्यबळाचा समन्वय, क्षेत्रनिहाय प्रतिसाद व्यवस्था आणि पूरनियंत्रण उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील काही भागांमध्ये नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अडथळ्यांमुळे बाधित झाल्याने पाणी साचल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत सर्व नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणे तातडीने हटविण्याच्या तसेच एमआयडीसी परिसरातील नाल्यांचा प्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागांना दिल्या.
आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी इन्सिडेंट कमांडर तर कार्यकारी अभियंत्यांनी सहाय्यक इन्सिडेंट कमांडर म्हणून जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश देण्यात आले. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने क्विक रिस्पॉन्स टीम सतत कार्यरत ठेवावी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिक सक्षमपणे सुरू ठेवावा आणि कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना तातडीने सेवा व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
यावेळी आमदार शंकर जगताप यांनी शहराच्या वाढत्या नागरीकरणाचा विचार करून दीर्घकालीन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय, नाल्यांची नियमित पाहणी, पावसाचे पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, मुख्य रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठी उपाययोजना, स्थलांतरित नागरिकांना आरोग्य सुविधा, मॉकड्रिलद्वारे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना प्रशिक्षण तसेच बांधकाम परवानगी देताना नैसर्गिक जलप्रवाहाचा विचार करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व घटकांचा सहभाग घेऊन सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता व्यक्त केली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने अधिक तत्परतेने घटनास्थळी पोहोचून नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, असे मत व्यक्त केले.
बैठकीत शहरातील पूरप्रवण भाग, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, मनुष्यबळाचे नियोजन, यंत्रसामग्रीची उपलब्धता, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरात भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी समन्वयित, सक्षम आणि सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
