8 वर्षापासून या योजनेचे काम सुरू असून एवढा खर्च केल्यानंतरही समान पाणी कधी मिळेल, याची शाश्वती नाही.

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
या प्रकल्पाचे काम मूळ नियोजनानुसार मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, जलवाहिन्या आणि पाणीमीटर बसविण्याच्या कामाचा मूळ आवाका सुमारे २५ टक्क्यांनी कमी करण्यात आला. त्यानंतरदेखील या प्रकल्पाला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. तीन दिवसांपूर्वी गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली. पुणे महापालिकेची समान पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ऑक्टोबरपर्यंत ही योजना कार्यान्वित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले. गेल्या आठ वर्षांत या योजनेचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून, आतापर्यंत या योजनेवर महापालिकेने १६०० कोटी रुपये खर्च केले आहेत. हे काम पूर्ण होण्यास नऊ ते दहा महिने लागतील, असा दावा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. या योजनेला लागलेला वेळ आणि त्यावर झालेला खर्च लक्षात घेता त्याची श्वेतपत्रिका काढून पुणेकरांसमोर ठेवावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली.
|
‘एक वेळ पाण्याचीही खात्री नाही’
‘शहरातील नागरिकांना २४ तास पाणी देण्यासाठी महापालिकेने आठ वर्षांपूर्वी समान पाणीपुरवठा योजना सुरू केली. मात्र, सद्यःस्थितीत पुणे शहरावर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे. समान पाणी पुरवठा योजना रखडली असतानाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या नियोजनामुळे पुणेकरांना दिवसातून एकवेळ पाणी मिळण्याची खात्री नाही आणि २४ तास पाणी देण्याची घोषणा केली जाते,’ अशी टीकाही वेलणकर यांनी केली.
‘समान आणि पुरेसे पाणी मिळण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या समान पाणीपुरवठा योजनेवर आतापर्यंत १६०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. आठ वर्षापासून या योजनेचे काम सुरू असून एवढा खर्च केल्यानंतरही समान पाणी कधी मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे या पोजनेच्या अंमलबजावणी बाबत शंका उपस्थित केली जात आहे.
शहरातील सर्व भागांतील नागरिकांना समान आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने २०१८ मध्ये समान पाणी पुरवठा योजना राबविण्यास सुरुवात केली. यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, पाण्याच्या टाक्या उभारणे आणि नागरिकांच्या नळजोडण्यांना पाणीमीटर बसविण्याचे नियोजन करण्यात आले होते.
