प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित सुधाकर चव्हाण यांच्या गुरुपूजन कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वरश्री संगीत फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी, प्रतिनिधी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
स्वरश्री संगीत फाउंडेशनच्या वतीने आयोजित अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे सचिव व प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित सुधाकर चव्हाण यांच्या गुरुपूजन कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
म्हातोबा मंदिर सभागृह वाकड येथे झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात नगरसेविका श्रुतीताई वाकडकर, रेश्माताई भुजबळ, ख्यातनाम पखवाज वादक ह.भ.प. तुकाराम भुमकर, प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. लहू महाराज जमदाडे, शास्त्रीय गायक नामदेव शिंदे यांच्या हस्ते झाले. पहिल्या सत्रामध्ये स्वरश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गायन संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या रागातील बंदिशी आणि छोटेख्याल सादर केले. त्यांना हार्मोनियमवर हरिभाऊ असतकर, गंगाधर शिंदे, तबल्यावर विक्रम शिंदे, यश त्रिशरण, पखवाजवर ओम विनोदे आणि टाळ मकरंद बादरायणी यांनी साथसंगत केली.
पहिल्या सत्राचा समारोप शास्त्रीय गायक नामदेव शिंदे यांच्या गायनाने झाला. त्यांनी विलंबित एकतालातील शुद्ध सारंग हा राग गायला आणि त्यानंतर ‘अधिक देखणे तरी निरंजन पाहणे’, या भजनाने पहिल्या सत्राची सांगता केली. त्यांना हार्मोनियमवर हरिभाऊ असतकर, तबल्यावर संतोष साळवे, पखवाजवर गंभीर महाराज अवचार, टाळ साथ मकरंद बादरायणी, तानपुरा साथसंगत लक्ष्मण कोळी आणि विवेक गवळी यांनी केली. हेमंत पुणेकर यांनी पहिल्या सत्राचे निवेदन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये स्वरश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गायन, तसेच विक्रम शिंदे यांच्या शिश्यांचे तबलावादन झाले. या तबला वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करीत टाळ्या मिळविल्या. दुसऱ्या सत्राचा समारोप अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे सचिव तसेच प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित सुधाकर चव्हाण यांच्या प्रगल्भ आणि दमदार गायनाने झाला. रसिकांना एक स्वरस्मरणीय अनुभव घेता आला. पंडित सुधाकर चव्हाण यांनी विलंबित एकताल आणि यमन रागातील ‘काहे सखी…’ या रचनेतून आणि ‘श्याम बजाये आज मुरलिया’ या बंदिशी सादर केली.
त्यानंतर शास्त्रीय गायक आणि पंडित सुधाकर चव्हाण यांचे शिष्य शिवानंद स्वामी यांनी रचलेली मधुकंस रागातील ‘बनरा रे संग आजा…’ ही बंदिश सादर केली. त्यांना हार्मोनियमवर गंगाधर शिंदे, तबल्यावर पंडित दत्तात्रय भावे, पखवाजवर गंभीर महाराज अवचार, टाळ साथसंगत मकरंद बादरायणी आणि गायन साथसंगत शिवानंद स्वामी यांनी केली. अभयसिंह वाघचौरे आणि विवेक गवळी यांनी तानपुऱ्यावर साथसंगत केली. या सत्राचे निवेदन आकाश थिटे यांनी केले.
