गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करावी…

yogesh kadam

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) शिवाजीनगर सत्र न्यायालयासमोरील रस्त्यावर २५ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास मंदार मारुती किवळे (वय ३५) याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोन दुचाकींवरून आलेल्या सहा जणांनी किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला; मात्र पिस्तुलातून गोळी न सुटल्याने गोळीबार झाला नाही. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले. या घटनेमुळे न्यायालय परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना अटक होऊन अद्याप २४ तासही पूर्ण झालेले नसल्याने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, या हल्ल्यात कोणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग होता, याचा तपास सुरू असून चौकशीनंतर हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होईल. संबंधित तरुण कुठून आले होते, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल होते का आणि त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती का, याची संपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे. तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

पुण्यासह राज्यातील कोणत्याही शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली. पुणे किंवा महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये काही जण स्वतःची दहशत निर्माण करून गुंडगिरीचे प्रदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर व आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे आदेश सर्व पोलीस युनिट प्रमुखांना देण्यात आले आहेत.

पुणे पोलिसांनी मागील सहा महिन्यांत मकोका (MCOCA) आणि एमपीडीए (MPDA) अंतर्गत अनेक कारवाया केल्या आहेत. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कारवाई अधिक तीव्र करण्याची आवश्यकता असून पोलिसांचा धाक काय असतो, हे दिसले पाहिजे, अशा सूचना पोलिसांना दिल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शहरात येणाऱ्या अवैध शस्त्रांच्या मुद्द्यावरही पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

Latest News