राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि परिसरातील रस्त्यांची दूरवस्था आणि पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले, हे अतिशय दुर्दैवी…

अपघातांमुळे दोन वर्षांत ३७ बळी
पुणे :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
खासदार सुळे म्हणाल्या की, हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि परिसरातील रस्त्यांची दूरवस्था आणि पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले, हे अतिशय दुर्दैवी असून सरकारसह सर्व शासकीय यंत्रणांचे अपयश आहे. देशाच्या औद्योगिक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या या परिसरातील पायाभूत सुविधांची दुर्दशा होणे अतिशय दुर्दैवी आहे. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या परिसरासाठी ‘सिंगल पॉईंट अथॉरिटी’ची घोषणा केली होती; मात्र त्यानंतरही अपेक्षित सुधारणा झाली नसून परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. या परिसरातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचा दर्जा तातडीने सुधारण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत असेल तर शासनासह सर्व यंत्रणांसाठी ही नामुष्कीची बाब आहे.हिंजवडीतील राजीव गांधी ‘आयटी पार्क’सह परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्न सुटत नसल्याने आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांनी ‘
स्मार्ट आयटी सिटी संकल्प’ मोर्चा रविवारी काढला. या मूक मोर्चाची सुरुवात ‘आयटी पार्क’मधील ‘इन्फोसिस सर्कल’पासून झाली. ‘आयटी पार्क’मध्ये गेल्या दोन वर्षांत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ३७ जणांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व महिला आयटी कर्मचाऱ्यांनी केले. या मोर्चात ‘आयटी’ कर्मचाऱ्यांसह स्थानिकांचाही मोठा सहभाग होता. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही मोर्चात सहभागी झाली. हा मोर्चा शिवाजी चौकमार्गे पुन्हा इन्फोसिस चौकात आला. तिथे राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता झाली. हिंजवडीतील राजीव गांधी ‘आयटी पार्क’मधील पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था आणि त्याबद्दल वारंवार पाठपुरावा करून सरकारचे होणारे दुर्लक्ष या मुद्द्यावरून हजारो संतप्त आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले. खड्डे आणि अपघातमुक्त रस्ते, वाहतूक कोंडीतून ‘आयटी पार्क’ची मुक्तता आणि पुरेसा पाणी पुरवठा या मागण्यांसाठी मूक मोर्चा काढण्यात आला. यावरून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आयटी पार्कसाठी हे दुर्दैवी असल्याची टीका केली आहे.
‘हिंजवडी, माण, मारूंजी परिसरात दररोज लाखो नागरिक, आयटी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. खराब रस्ते आणि पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे. आयटी पार्कमध्ये खराब रस्त्यांमुळे अपघात घडून गेल्या दोन वर्षांत ३७ जणांचा बळी गेली आहे. तरीही, शासकीय यंत्रणांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आम्ही आंदोलन केले. कालमर्यादा निश्चित करून शासनाने हे प्रश्न सोडवावेत, अशी आमची मागणी आहे,’ अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. आंदोलनात आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक शेतकरी, रहिवासी, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन माण,
हिंजवडी-माण-मारूंजी इन्फ्रा फोरम, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज, हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड को-ऑप हाऊसिंग फेडरेशन, मुळशी को-ऑप हाऊसिंग फेडरेशन या संघटना सहभागी झाल्या आहेत. शांततामय पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले. त्यात आंदोलकांनी फलक हातात घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि परिसरातील रस्त्यांची दूरवस्था आणि पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले, हे अतिशय दुर्दैवी… या मोर्चात शिवसेना ( उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सहभागी होऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला.
