गणेशोत्सव: कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) गर्दीच्या ठिकाणी, मुख्य मिरवणूक मार्गांवर आणि प्रमुख गणपती मंडळांच्या परिसरात महिलांशी गैरवर्तन किंवा अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ कडक कारवाई केली जाईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षेचा अतिरिक्त स्तर म्हणून शहरातील महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती पुण्यातील वाहतूक मार्गात आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले असून, संपूर्ण शहरावर शेकडो सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जात आहे. पुणे पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिक, भाविक आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे सूचित करण्यात आले आहे.
पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला सुरुवात आजपासून होत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोटबंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या बारा दिवसांच्या कालावधीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह तब्बल सव्वा सात हजार पोलिस अधिकारी आणि अंमलदार शहराच्या रस्त्यावर तैनात राहणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, तसेच भाविकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे.
गर्दीचा फायदा घेणाऱ्यांवर असेल वॉच
गणेशोत्सवात शहरातील प्रमुख गणेश मंडळे, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गुन्हे शाखेकडून साध्या वेशातील पथके तैनात करण्यात येणार असून, गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकीट व मौल्यवान वस्तूंच्या चौऱ्या करणाऱ्या सराईतांवर त्यांची करडी नजर राहणार आहे. महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी छेडछाडविरोधी पथकेही सक्रिय राहणार आहेत. गर्दीमध्ये महिलांची छेडछाड, गैरवर्तन किंवा अनुचित प्रकार करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. त्याबरोबर संवेदनशील ठिकाणी क्यूआरटी आणि एसआरपीएफची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
गणेशोत्सवासाठी पोलिसांचा फौजफाटा
वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून अंमलदारांपर्यंत मोठी यंत्रणा
अप्पर पोलिस आयुक्त : ४
पोलिस उपायुक्त: १४
सहाय्यक पोलिस आयुक्त : ३०
पोलिस निरीक्षक २१५
पोलिस उपनिरीक्षक : ७००
पोलिस अंमलदार: ७ हजार २००
होमगार्ड : १ हजार १००
क्यूआरटी व एसआरपीएफची पथकेही तैनात-
- गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात शहरातील मानाचे आणि प्रमुख गणेश मंडळ परिसरात मोठा फौजफाटा तैनात
- गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी, मोबाईल किंवा सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर गुन्हे शाखेकडून लक्ष
- गर्दीच्या ठिकाणी महिला आणि तरुणींची छेडछाड रोखण्यासाठी विशेष छेडछाडविरोधी पथके सक्रिय
