मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा पिंपरी – चिंचवड महापालिकेला विसर

ps logo rgb

पिंपरी, प्रतिनिधी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या १७ सप्टेंबरला ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अधिकृत राजपत्राद्वारे घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयानंतरही पिंपरी-चिंचवड शहरात या ऐतिहासिक दिवसाचे अपेक्षित स्वरूपात स्मरण होत नसल्याने महापालिका प्रशासन आणि शहरातील राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या संदर्भात मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी नाराजी व्यक्त करीत सांगितले, की भारत सरकारच्या १२ मार्च २०२४ रोजीच्या राजपत्रात (CG-DL-E-12032024-252904) हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीचा इतिहास नमूद करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला असला, तरी हैदराबाद संस्थानातील जनता आणखी १३ महिने निजामाच्या राजवटीखाली होती.

१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. हैदराबाद स्वतंत्र्य लढ्यातील शहीदांचे बलीदान लक्षात राहावे, यासाठी हा दिवस देशभरात साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
विशेष म्हणजे सुमारे तीन लाख मराठवाडावासिय पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात वास्तव्यास आहेत. केंद्र सरकारने अधिकृत राजपत्र काढून १७ सप्टेंबरच्या ऐतिहासिक महत्त्वाची नोंद घेतलेली असताना, पिंपरी-चिंचवडसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरात या दिवसाचे स्मरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने किती गांभीर्याने पुढाकार घेतला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरात विविध राष्ट्रीय दिन, महापुरुषांच्या जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त महापालिका स्तरावर कार्यक्रम घेतले जातात. मात्र, मराठवाडा मुक्ती संग्रामाशी संबंधित १७ सप्टेंबर या ऐतिहासिक दिवसासाठी स्वतंत्र कार्यक्रम, हुतात्म्यांना अभिवादन, व्याख्यान, इतिहास प्रदर्शन अथवा विद्यार्थ्यांसाठी जनजागृती उपक्रम राबविण्याची गरज प्रशासनाला का वाटत नाही? असा प्रश्न अरुण पवार यांनी उपस्थित केला आहे.
१७ सप्टेंबर हा केवळ एका प्रदेशाचा दिवस नसून, भारताच्या एकात्मतेच्या आणि स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्यायाचे स्मरण करणारा दिवस आहे. केंद्र सरकारच्या राजपत्राने या दिवसाला दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि शासकीय यंत्रणांनी या ऐतिहासिक दिवसाची जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.


१७ सप्टेंबरच्या कार्यक्रमाला कोणत्याही राजकीय चौकटीत न पाहता तो इतिहास, हुतात्म्यांचे बलिदान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवस म्हणून साजरा करण्याची गरज आहे. महापालिकेने पुढाकार घेतल्यास शहरातील मराठवाडावासीयांसह सर्व नागरिकांना या इतिहासाशी जोडता येईल. महापालिकेच्या दालनात ठराविक दिवसांचे कार्यक्रम होतात; मग मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या स्मरणासाठी एक दिवस देणे एवढे कठीण का असावे? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम ही भारतीय इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये १७ सप्टेंबरनिमित्त व्याख्याने, निबंध स्पर्धा, इतिहास प्रदर्शन, चित्रफिती, स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केल्यास नव्या पिढीला या संघर्षाची माहिती मिळू शकते. हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवणे, इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या या महत्त्वपूर्ण अध्यायाचे स्मरण करणे हीच त्या वीरांना खरी आदरांजली ठरेल.
– अरुण पवार, संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ पिंपरी चिंचवड.

Latest News