महापालिकेच्या घंटागाडी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना ३० हजारांचे दिवाळी बक्षीस मिळणार!

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या मान्यतेने घंटागाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात; कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
पिंपरी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छता सेवा अविरतपणे राबविणाऱ्या आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या घंटागाडी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक निर्णय स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी घेतला आहे. सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी आरोग्य विभागांतर्गत काम करणाऱ्या सर्व घंटागाडी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त विशेष बाब म्हणून प्रत्येकी ३० हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान किंवा बक्षीस देण्याच्या महत्त्वपूर्ण विषयाला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता, कर्मचाऱ्यांच्या हिताचा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असल्याने घंटागाडी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत १९९७ पासून घंटागाडी कंत्राटदार आरोग्य विभागांतर्गत शहरातील अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, ज, ल या १० क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची सेवा बजावत आहेत. महापालिकेच्या वतीने या घंटागाडी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना २००६ पासून सातत्याने दिवाळी सणानिमित्त विशेष बक्षीस देण्याची परंपरा चालत आली आहे. गतवर्षी म्हणजेच २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातही दिवाळी सणासाठी प्रती घंटागाडी कंत्राटदार कर्मचाऱ्यास ३० हजार रुपये विशेष बक्षीस म्हणून अदा करण्यात आले होते.
याच धर्तीवर यंदाही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ तसेच विविध घंटागाडी कंत्राटदारांनी सन २०२५-२०२६ करीता दिवाळी सणानिमित्त विशेष बाब म्हणून बक्षीस देण्याची विनंती केली होती. कामगारांच्या या न्याय्य मागणीची दखल घेत, मागील वर्षाप्रमाणेच यंदाच्या वर्षीही सन २०२५-२०२६ करिता घंटागाडी कंत्राटदारांना प्रति कंत्राटदार ३० हजार रुपये दिवाळी बक्षीस म्हणून देण्यासंदर्भात आयुक्तांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत मान्यता प्रदान केली आहे. या अनुषंगाने होणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास आता स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
प्रतिक्रिया….
”शहराचा कचरा गोळा करून स्वच्छ व सुंदर ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी हे घंटागाडी कंत्राटदार आणि त्यांचे कर्मचारी अहोरात्र पार पाडतात. त्यांच्या या मेहनतीची दखल घेणे आणि त्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही घंटागाडी कर्मचाऱ्यांना ३० हजार रुपयांचे दिवाळी बक्षीस देण्याचा निर्णय अत्यंत सार्थ व कर्मचाऱ्यांच्या हिताचा आहे. यामुळे कामगारांच्या दिवाळीत नक्कीच गोडवा वाढेल आणि त्यांच्या कष्टाचे चीज होईल.
- अभिषेक बारणे, सभापती- स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.
