डॉक्टर/नर्स कोरोना आढळल्याने मुंबईवरील कोरोनाचे संकट कायम

मुंबई. मुंबईत उच्चभ्रू सोसायट्यांसह झोपडपट्टीमध्येही कोरोनाने शिरकाव केला असून आता तर डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने मुंबईकरांवरील संकट आणखी गंभीर झाले आहे. मुंबईत गुरुवारीही १०० च्या वर नवे कोरोनाग्रस्त सापडले आणि ९ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या केईएममधील एका डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील डॉक्टर आणि नर्सच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मुंबईतील तीन हॉस्पिटल बंद करण्यात आले आहेत. सोमवारपासून नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद करण्यात येणार असून मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त असलेल्या भागातील भाजीपाल्याची दुकानेही बंद केली जाणार आहेत.. धारावी झोपडपट्टीत गुरुवारी तिसऱ्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेसाठी विशेष योजना तयार करण्यात आली आहे. यासाठी नुकतीच मुंबई महापालिकेचे अधिकारी, खासदार राहुल शेवाळे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष यांची बैठक झाली. इंडियन मेडिकल असोसिएशन या योजनेअंतर्गत १५० डॉक्टर देणार असून दोन खासगी डॉक्टरांसोबत दोन मनपाचे डॉक्टर आणि एक सहायक अशी पाच जणांची टीम तयार करून त्यांच्या मदतीने धारावीतील साडेसात लोकांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. ड्रोनच्या मदतीने संपूर्ण धारावीचे सॅनिटायझेशनचा प्रयत्न करणार आहे.