शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात लॉकडाउनमुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु होणार की ऑनलाइन शिक्षणाचा पर्यायच निवडला जाणार याकडे राज्यातील पालकांचे लक्ष लागून राहिले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

शाळा प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पद्धतीने सुरु करण्यात येणार आहेत तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसेच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.

आज नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असताना शैक्षणिक कामकाज कोरोना पार्श्वभूमीवर कसे सुरू होणार याकडे शिक्षण जगताचे लक्ष लागले आहे. याविषयी विद्यार्थी-पालक यांनाही कुतूहल निर्माण झाले होते. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शाळा बंद ठेवण्यात याव्यात, असे आदेश सोमवारी शाळांना शिक्षण विभागाकडून प्राप्त झाले होते.

शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. शिक्षकांना शाळेत हजर राहण्याच्या आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शाळेचा सोमवारी पहिला दिवस सुरु होत असताना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळांमध्ये हजेरी लावली. पण शैक्षणिक कामकाज शिक्षण विभागाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले.

Latest News