राष्ट्रीय पुरस्कार विजेते ”कांचन नायक” काळाच्या पडद्याआड


पुणे – मराठी चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते कांचन नायक यांचं आज निधन झालं. मृत्यूसमयी ते ६५ वर्षांचे होते. पुण्यातल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.कांचन नायक गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते.
कांचन नायक यांची लेखक, दिग्दर्शक अशी ओळख होते. सामाजिक विषय, विनोदी चित्रपट, भावना, नातेसंबंध आदी विषयांवर कांचन चित्रपट दिग्दर्शन करत असत. कळत-नकळत हा त्यांचा पहिला दिग्दर्शित केलेला चित्रपट होता. या पहिल्याच चित्रपटाला त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच, चार राष्ट्रीय पारितोषिके तसंच सर्वोत्कृष्ट चित्रपटासह नऊ राज्य पारितोषिके मिळाली होती. त्यानंतर २००७ साली सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वि.वा. शिरवाडकर लिखित त्यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘विश्वनाथ-एक शिंपी’या लघुचित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.