WHO चा कोरोना लसीबाबत इशारा; घाईगडबडीत परवानग्या देऊ नका!

नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना प्रतिबंधक लसीबाबत सर्वच देशांना धोक्याचा इशारा देत कोरोना लसीबाबत घाईगडबडीत परवानग्या दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असे म्हटले आहे. कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपत्कालीन वापराच्या अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) परवानग्या देत असल्याचे नुकतेच म्हटल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हा धोक्याचा इशारा दिला. कोरोना प्रतिबंधक लसींचा वापर करण्यासाठी घाई करू नका, असा सल्ला देखील जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. परिणामकारकता आणि सुरक्षिततेबद्दल खात्री नसलेल्या कोरोना लसींचा वापर केल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देताना संबंधित प्राधिकरणांनी जाणीवपूर्वक निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीला तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्याशिवाय परवानगी द्यायची नाही, यावर सगळ्यांचे एकमत आहे. कोरोना लसीला सर्व चाचण्या झाल्याशिवाय परवानगी देणे धोकादायक ठरू शकते. अपुऱ्या चाचण्या झालेल्या लसींचा वापर केल्यास कोरोना संकटाचा अंत होणार नाही. उलट हे संकट आणखी गंभीर स्वरुप धारण करेल. त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, असे स्वामीनाथन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. कोरोना लसीबद्दल नुकताच एक महत्त्वाचा निर्णय अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त स्टिफन हान यांनी घेतला. केवळ तिसऱ्या टप्प्यात लस आहे, म्हणून तिला परवानगी नाकारणार नसल्याचे यांनी ‘फायनान्शियल टाईम्स’ वृत्तपत्राला सांगितले. लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झालेला नसला, तरीही आम्ही लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देऊ. वैज्ञानिक माहितीच्या आधारे याबद्दलचे निर्णय घेतले जातील, असे देखील हान यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार कोरोनावरील लस चालू वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल, असे म्हटले आहे. ३ नोव्हेंबरच्या आधी बाजारात कोरोनाची लस येईल, असा उल्लेख ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाची ३ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. यात डोनाल्ड ट्रम्प देखील उमेदवार आहेत.

Latest News