मशीदीत जाण्यापूर्वीच खासदार इम्तियाज जलील यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात!

jalil-4

औरंगाबाद : राज्यात सध्या धर्मस्थळ उघडण्यासाठीची आंदोलने प्रचंड गाजत आहेत आणि दररोज यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नवीन गोष्टी समोर येत आहेत. काल औरंगाबादमध्ये खासदार ईम्तीयाज जलीलांनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केले म्हणून त्यांच्यावर काही मुस्लिम धर्मगुरू नाराज झाले होते. तर, आज परवानगी नसतानाही मशिद उघडून नमाझ अदा करण्यासाठी जाणारे एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच खबरदारी म्हणून खासदार जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. ‘आज मंदिर कल मस्जिद’ अशा आशयाचे ट्विट औरंगाबादचे खासदार ईम्तीयाज जलीलांनी केल्यानंतर वादंग सुरू झाले होते. काल, पुजाऱ्याना निवेदन देऊन खडकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचे नियोजन जलीलांकडून केले गेले होते, मात्र शिवसेनेचे नेते कार्यकर्त्यांसह या मंदिराबाहेर जमल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, आज खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील शहागंज येथील मशिदीत प्रवेश करून नमाझ अदा करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी त्याआधीच कारवाई करत खासदार जलील यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे शहागंज मशिद परिसरात एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मशीद परिसरात कुणालाही प्रवेश मिळणार नाही, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

Latest News