माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या मिठाला जागणाऱ्या काही अधिकाऱ्यांची बदली : हसन मुश्रीफ


मुंबई : “माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या मिठाला जागणाऱ्या काही अधिकाऱ्यांची बदली केली,” असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. ठाकरे सरकारकडून पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 40 हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोना काळात अधिकाऱ्यांच्या बदलीचं सत्र सुरु असल्याने सरकारवर टीका केली जात आहे. “काही अधिकारी फडणवीस सरकार काळातील ते खाल्या मिठास जगात होते. यामुळेच त्यांना बदललं,” अशी टीका मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांचं नाव न घेता केली. दरम्यान नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झालीे आहे. नांगरे पाटील यांच्या जागी दीपक पांडे यांची वर्णी लागली आहे. तर नाशिक परिमंडळचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची मुंबईत विशेष पोलीस तुरुंग महानिरीक्षकपदी (सुधार सेवा) बदली झाली आहे, तर प्रताप दिघावकर यांना नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोरोना संकट वाढतंय, म्हणून धार्मिक स्थळं बंद
तसेच राज्यातील धार्मिक स्थळं सुरु करावी यासाठी आंदोलन केलं जातं आहे, यावर मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. “मंदिर-मशिद सुरु करावे म्हणून आंदोलन केले जात आहे. पण कोरोना संकट वाढत आहे, त्यामुळे बंद ठेवले, आता ई-पास काढला. लोक प्रवास करतील. मात्र अजून कोरोनाची भीती आहे. काही दिवस लोकांनी थोडा संयम बाळगावा,” असे हसन मुश्रीफ म्हणाले.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री, सह्याद्री येथून चांगले काम करत आहे. राज्यातील समस्या सोडवत आहे. विरोधक विनाकारण सीएम यांना बदनाम करत आहेत,” असे मुश्रीफ म्हणाले.
“ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या मालमत्तेवर कर्ज मिळेल. त्यामुळं ग्रामीण लोकांना दिलासा मिळेल. कोरोना संकटात आर्थिक व्यवहार करायचे असेल. तर कर्ज घेता येईल,” असा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला.