नियोजनशून्य भोंगळ कारभार लपविण्यासाठीच पिंपरी-चिंचवड पालिकेकडून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण – नगरसेविका चिंचवडे

पिंपरी-चिंचवड शहरवासीयांची तहान भागविणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पाणी कपात रद्द करण्याची कोणी मागणी करू नये यासाठी पालिका प्रशासनाने त्वरित सेक्टर नं 23 मधील देखभाल, दुरूस्तीची कामे करण्याची कामे काढली. या माध्यमातून शहरवासीयांना नाहक वेठीस धरले जात आहे. नियोजनशून्य भोंगळ कारभार लपविण्यासाठीच पालिकेकडून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केला आहे. शहरात समान व पुरेशा दाबाने दररोज पाणीपुरवठा करावा; अन्यथा शहरातील महिला-भगिनी, नागरिक, जनआंदोलन उभारतील, हे लक्षात घ्यावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत नगरसेविका चिंचवडे-पाटील यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पवना धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. असे असताना पिंपरी- चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाने मागीलवर्षीप्रमाणेच धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाल्यानंतरच त्वरित सेक्टर नं 23 मध्ये देखभाल, दुरूस्तीची कामे काढली आहेत. या निमित्ताने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणी कपात रद्द करण्याची कोणी मागणी करू नये, यासाठी शहरवासीयांना वेठीस धरले जात आहे.

मागीलवर्षी खासदार, नगरसेवक व पदाधिका-यासोबत सेक्टर नं. 23 मध्ये आयुक्तांसोबत मिटींग झाली होती. त्यावेळी पाणीपुरवठा अधिकारी आणि आयुक्तांनी पुढील वार्षिक नियोजन आम्हाला प्रोजेक्टरवर दाखविले होते. परंतू, ते कागदावरच राहिले. तसेच 24x 7 पाणीपुरवठा कामाचे तीनतेरा वाजले आहेत. ठेकेदारावर नाममात्र दंडात्मक कारवाई करून ठेकेदार पोसण्याचे काम सुरू आहे. नियोजनशून्य भोंगळ कारभार लपविण्यासाठी पाणीपुरवठा विभाग कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करीत आहे.

शहरातील अनेक महिला नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी सांभाळतात. पाणी कपातीमुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची दिनचर्या, दैनंदिन कामकाज बिघडून नागरिक व महिला भगिनींना गेली वर्षभर नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. लहान, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना देखील टँकरने पाणी मागवावे लागत आहे. त्यामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊन टँकरलॉबीचा फायदा होत आहे.

शहरात समान व पुरेशा दाबाने दररोज पाणीपुरवठा करावे. पाणीपुरवठा विभागाला योग्य त्या कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका चिंचवडे यांनी केली आहे.

Latest News