बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे पांडेंचं तिकीट का कापलं असावं?


मुंबई : जेडीयूमध्ये नुकतेच प्रवेश केलेले बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुप्तेश्वर पांडेंच्या ‘तेलही गेले, तूपही गेले’ अवस्थेवर भाष्य केलं आहे. गुप्तेश्वर पांडे यांना बिहार विधानसभा निवडणुकीचे तिकीट देणे, हा संबंधित पक्षाचा (जेडीयू) विषय आहे. आम्ही विचारलं होतं, की (जेडीयूसोबत आघाडी असल्यामुळे) भाजप नेते त्यांचा प्रचार करणार का? याच प्रश्नाच्या भीतीपोटी पांडेंना तिकीट दिलं नसावं, असं अनिल देशमुख म्हणाले
‘शुभचिंतकांच्या फोननी मी हैराण झालोय, त्यांची चिंता मी समजू शकतो. मी सेवामुक्त झाल्याने निवडणूक लढवेन, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु मी यावेळी निवडणूक लढवत नाही. माझं आयुष्य संघर्षमय होतं. मी जीवनभर जनतेची सेवा करत राहीन. कृपया संयम बाळगा आणि मला फोन करु नका’ अशा भावना पांडे यांनी तिकीट न मिळाल्यानंतर सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या.
ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारच्या पोलिस महासंचालकपदाचा राजीनामा देऊन जेडीयूमध्ये प्रवेश केलेल्या गुप्तेश्वर पांडे यांना मोठा धक्का बसला आहे. जेडीयूने आपली 115 जणांची उमेदवार यादी प्रसिद्ध केली, मात्र बक्सरमधून निवडणूक लढवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नाही.
गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली.
गुप्तेश्वर पांडे यांनी काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. बिहारचे पोलिस महासंचालक म्हणून व्हीआरसी घेतल्यावर पांडे राजकारणात प्रवेश करण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या, मात्र ते वारंवार फेटाळून लावत होते. अखेर या अटकळी खऱ्या ठरवत त्यांनी जेडीयूतून राजकारणात पाऊल ठेवलंच.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान तर 10 नोव्हेंबरला निकाल आहे.