तंगड्यात तंगडं घालून सर्व बंद ठेवण्याची मानसिकता आमची नाही -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गेले ६ महिने कोरोनाने राज्यासह देशात देखील थैमान घातला आहे. कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. तर, जून महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरु केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता अनलॉक- ५ लागू करण्यात आला असून रेस्टोरंट, बार देखील सुरु करण्यात आले आहेततर, भाजपसह वंचित बहुजन आघाडीने देखील मागील महिन्यात प्रार्थनास्थळे सुरु करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं होतं. भाजपने घंटानाद आंदोलन करून देखील कुंभकर्णापेक्षा गाढ झोपेत असलेल्या सरकारला जाग कधी येणार असा उद्विग्न सवाल करण्यात आला होता. तर, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वारकरी संघटनांसोबत आंदोलन करत पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात प्रवेश करून आंदोलन करण्यात आलं. मात्र, अजूनही मंदिर खुले करण्याबाबत सरकारने पावले उचलले नसल्याने भाजपने महाविकास आघाडीवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थिती, मुंबई लोकल, प्रार्थनास्थळे सुरु करण्यावर भाष्य केलं आहे. ‘गणपती होऊन गेले, नवरात्र, दिवाळी येत आहे. त्यामुळे मी मंदिर खुली करण्याबाबत हळुवार पणाने जात आहे. काही जणं म्हणतात हे उघडलं ते का नाही? जबाबदारी आमच्यावर आहे आणि त्याहून जास्त जनतेवर प्रेम आहे. त्यामुळे तंगड्यात तंगडं घालून सर्व बंद ठेवण्याची मानसिकता आमची नाही. त्यामुळे येत्या सर्वधर्मांच्या सणात आपल्याला खूप काळजीपूर्वक राहावं लागणार आहे’ असं सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

दरम्यान, अजूनही मंदिर खुले करण्याबाबत सरकारने पावले उचलले नसल्याने भाजपने महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत लाक्षणिक उपोषणाचे आयोजन केले आहे. भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ‘ ठाकरे सरकारने मंदिरा ऐवजी मदिरा सुरु केले असून संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मंदिर बंद, बार सुरु असे काळे चित्र निर्माण केले असून १३ ऑक्टोबरला विविध संप्रदायातील साधू-संत व अध्यात्मिक संघटनांना सोबत घेऊन लाक्षणिक उपोषण करणार’ असल्याचं सांगितलं आहे.

Latest News