व्होडाफोन-आयडिया नेटवर्क पाणी शिरल्याने सर्व्हर डाऊन

Vi-696x365-1

पुणे- पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काल मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसानं अनेकांच्या घरात आणि दुकानांत पाणी शिरलं. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी साचल्याचं चित्र समोर आलं होतं. विशेष म्हणजे देशातील आघाडीची मोबाईल सेवा पुरवठादार असलेल्या वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क गायब झाले.

पुण्यात झालेल्या तांत्रिक बिघाडाने राज्याच्या निम्म्याहून जास्त सर्कलमध्ये ग्राहकांच्या त्रास सहन करावा लागला. पण वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क ठप्प होण्यामागे वेगळंच कारण समोर आलं आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने वोडाफोन-आयडियाच्या नेटवर्कला मोठा झटका बसलाय. कल्याणीनगर येथील मुख्य कार्यालयात पाणी शिरल्याने सर्व्हर डाऊन झाल्याचं सांगितलं जातयं. त्यामुळे लाखो लोकांचे मोबाईल नॉट रिचेबल झाले होते.

रात्रीपासून मोबाईल नेटवर्क गेल्याने व्हीआयच्या ग्राहकांनाही मोठं नुकसान झालंय. त्यामुळे संतप्त झालेल्या व्हीआयच्या ग्राहकांनी व्होडाफोन-आयडियाच्या स्टोअर बाहेर मोठी गर्दी केली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. दरम्यान, कल्यानीनगरमधील मुख्य सर्व्हर बंद झाल्याने महाराष्ट्रासह गोव्यातील लाखो मोबाईल बंद आहेत. लवकरात लवकर मोबाईल यंत्रणा सुरू होईल, असं व्हीआयकडून सांगण्यात आलंय.

तत्पूर्वी राज्यातील काही भागात बुधवार (14 ऑक्टोबर) रात्रीपासून VI चे नेटवर्क गायब झाले होते. त्यामुळे पुणे आणि आसपास भागात VI च्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईतदेखील काही ठिकाणी VI चे नेटवर्क डाऊन झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांनी सोशल मीडियावर कंपनीबाबत पोलखोल केली. नेटवर्क नसल्याने ग्राहकांना कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी देखील संपर्क करणे अवघड बनले आहे. काहींनी ट्विटरवर VI च्या नेटवर्कबाबत तीव्र नाराज व्यक्त केली. यामुळे ट्वीटरवर #Vodafone down #vodafone india हे वोडाफोनचे टॅग ट्रेंडिंगमध्ये आले आहेत.

Latest News