PCMC महापालिकेकडून शहरात सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर टप्प्या-टप्प्याने बंद करण्यास सुरुवात…

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून घटत चालली आहे. दररोज सरासरी 250 ते 300 रुग्ण आढळत आहेत. महापालिकेकडून शहरात सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर टप्प्या-टप्प्याने बंद करण्यास सुरुवात केली आहे. 21 पैकी केवळ तीनच कोविड सेंटर कार्यरत आहेत. महापालिकेचे पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालय, ऍटो क्लस्टर येथील रुग्णालय, नेहरूनगर येथील जम्बो रुग्णालय, महापालिकेची 7 रुग्णालयांमध्ये सध्या करोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहे. त्याशिवाय, शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये देखील करोनाचे रुग्ण दाखल आहेत.
शहरात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या घटत चालली आहे. दररोज सरासरी 250 ते 350 करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. सप्टेंबर महिन्यात रोज एक हजाराहून अधिक रुग्ण आढळत होते.
खासगी रुग्णालये व हॉटेल्समधील 40 कोविड केंद्र सुरू आहेत. त्यांना परवानगी दिलेली आहे. तथापि, महापालिकेकडून या व्यतिरिक्त 21 कोविड केंद्र सुरू करण्यात आले होते. रुग्ण संख्या घटत चालल्याने या केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. सुरुवातीला 5 केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्याने केंद्र बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली. बालेवाडी, भोसरी बालनगरी आणि स्वस्त घरकुल प्रकल्पातील कोविड केंद्र सध्या सुरू आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.