भारतीयांना लस देण्यासाठी मार्च 2021 उजाडू शकतो- सिरम

las-8

पुणे: देशाला सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीची प्रतीक्षा आहे. ही लस डिसेंबरअखेर प्राप्‍त होण्याची शक्यता होती. मात्र, सर्व परवानग्या मिळून लस भारतीयांना देण्यासाठी मार्च 2021 उजाडू शकतो, अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.

सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सिरम व ऑक्सफर्डच्या ‘अस्ट्राजेनेका’ संस्थांबरोबर ‘कोव्हिशिल्ड’ लसनिर्मितीसंदर्भात करार केलेला आहे. या लसीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी देशात सुरू आहे. पुण्यातील ससूनसह इतर चार रुग्णालयांमध्ये चाचणी झाली आहे. आता लसीच्या अंतिम निरीक्षणाची प्रतीक्षा आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये डिसेंबरअखेर 70 ते 80 कोटी डोसची निर्मिती करण्यात येईल. देशातील जवळपास 55 टक्के नागरिक हे 50 वर्षांच्या आतील आहेत. कोरोना योद्ध्यांना ही लस प्राधान्याने देण्यात येईल, असेही डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.

सिरमसह आणखी एका दुसर्‍या कंपनीच्या लसीची चाचणी अंतिम म्हणजेच तिसर्‍या टप्प्यात आहे. एक लस दुसर्‍या टप्प्यात आहे. आणखी एका कंपनीची लसीची मानवी चाचणी दुसर्‍या टप्प्यात सुरू आहे. सिरमसह भारत बायोटेक, झायडस कॅडिला व अनेक कंपन्या लस शोधण्यासाठी कार्यरत आहेत.

Latest News