पिंपरी रिक्षा चालकांना नियम पाळण्याचे आवाहन – सहाय्य्क पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले


पिंपरी :लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर रिक्षामधून प्रवासी वाहतुकीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र रिक्षा चालक शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत असून शहरातील रस्त्यांवर अस्ताव्यस्त रिक्षा पार्क करत आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी रिक्षा चालकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली टाळेबंदी शिथिल केली जात आहे. रिक्षा चालकांना देखील सामाजिक अंतर आणि योग्य खबरदारी घेऊन प्रवासी वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु, सध्या शहरातील रिक्षा चालक गणवेश परिधान न करता, बॅच बिल्ला, लायसन्स, रिक्षाची कागदपत्रे जवळ न बाळगता प्रवासी वाहतूक करत असल्याचे वाहतूक शाखेच्या निदर्शनास येत आहे. अनेक रिक्षा चालक चौकांमध्ये व रस्त्यावर रिक्षा अस्ताव्यस्त पार्किंग करुन उभे राहतात. यामुळे पिंपरी चिंचवड शहरात रिक्षा चालकांची व वाहतूकीची प्रतिमा मलिन होत आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायजर, रिक्षा चालक व प्रवासी यांच्यामध्ये प्लास्टिक पडदा इत्यादींचा वापर करणे बंधनकारक आहे. काही रिक्षा चालक या बाबींची पूर्तता करत नसल्याचे देखील दिसत आहे. रिक्षा चालकांनी ही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सर्व रिक्षा चालक, मालक यांनी 28 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छ गणवेश, बॅच बिल्ला, लायसन्स व रिक्षाच्या कागदपत्रांची पुर्तता करावी. त्यानंतर वाहतूक शाखेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सहाय्यक आयुक्तांनी सांगितले आहे.