अखेर एकनाथ खडसेंचि भाजपला सोडचिठ्ठी…

जळगाव: भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. खडसे यांनी आज थेट पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता खडसे यांच्यासोबत नेमके कोण-कोण जाणार याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत आज ही घोषणा केली. ‘खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फोन करून मला ही माहिती दिली. शुक्रवारी दुपारी २ वाजता आपल्या समर्थकांसह खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना पक्षात काय मिळणार हे
आत्ताच सांगता येणार नाही. त्यांच्यासारखा नेता आमच्या पक्षात येतोय ही आनंदाची बाब आहे. राज्यात भाजपचा विस्तार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, पक्षात त्यांच्यावर अन्याय झाला. त्यामुळंच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीमध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो,’ असंही पाटील म्हणाले.
एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपला सोडण्याची अनेक आमदारांची इच्छा आहे. मात्र, त्यांनी पक्षांतर केल्यास पोटनिवडणुका घ्याव्या लागतील. करोनाच्या संकटाच्या काळात निवडणुका घेणं परवडणार नाही. मात्र, त्यांना मानणारे आमदार कालांतराने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही जयंत पाटील यांनी केला.