भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी सोसायटीच्या आवारात बेकायदा बांधकाम केल्याचा प्रकार

shilimkar

पुणे :  पुणे-सातारा रस्त्यावरील रॉयल आर्केड सोसायटीचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी सोसायटीच्या आवारात बेकायदा बांधकाम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावरील दोन सदनिकांचे उपाहारगृहात रूपांतर करण्याचा घाट शिळीमकर यांनी घातला असून, नियोजित उपाहारगृहात ये-जा करण्यासाठी लोखंडी पूल (रॅम्प)  बांधण्याचे काम सुरू आहे. या बेकायदा बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी सोसायटीतील रहिवाशांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

सोसायटीतील रहिवाशांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच अतिक्रमण बांधकाम निर्मूलन विभागाकडे तक्रार अर्ज नुकताच दिला आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील श्री शंकर महाराज मंदिराजवळ रॉयल आर्केड सोसायटीतील ‘बी ’ इमारतीत तिसऱ्या मजल्यावर सदनिका क्रमांक ७ आणि ८ चे रूपांतर उपाहारगृहात (रेस्टॉरंट) मध्ये करण्याचा शिळीमकर यांचा प्रयत्न आहे. या सदनिकेच्या शेजारी असलेल्या सदनिका निवासी आहेत. तिसऱ्या मजल्यावरील नियोजित उपाहारगृहामुळे सोसायटीतील रहिवाशांना त्रास होणार आहे, असे सोसायटीतील रहिवाशांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

नियोजित उपाहारगृहात ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून एक लोखंडी रॅम्प बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अंदाजे ५० फूट लांब आणि २० फूट उंचीचा लोखंडी रॅम्प आहे. शिळीमकर यांनी सोसायटीतील जागेचा वापर केला आहे. या बांधकामाचा कोणताही प्रस्ताव सोसायटीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडण्यात आला नाही. सोसायटीच्या सभासदांनी मंजुरी देखील दिली नाही. शिळीमकर यांनी सोसायटीच्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोर पत्र्याचे दुमजली शेड उभे केले आहे. या शेडचा वापर फर्निचर व्यावसायिक दुकान म्हणून करत आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर महापालिके कडे रहिवाशांनी तक्रार देखील केली होती. मात्र, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारात पत्र्याचे मोठे शेड बांधून तेथे शिळीमकर यांनी अन्नछत्र सुरू केले आहे. ‘वीस रुपयात पोटभर जेवण ’, अशी पाटी तेथे लावण्यात आली आहे. काही अंतरावर आणखी एक मोठी पत्र्याची शेड बांधण्यात आली असून तेथे मंडळाच्या गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली असल्याची तक्रार रहिवाशांनी केली.

धोकादायक पुलामुळे जीव टांगणीला

सोसायटीच्या आवारात बांधण्यात येणारा लोखंडी पूल कोसळल्यास गंभीर स्वरूपाची दुर्घटना घडू शकते. सोसायटीच्या आवारातील पाच इमारतीतील रहिवाशांनी उपाहारगृहाला विरोध केला आहे. बेकायदा पुलाचे काम त्वरित थांबविण्यात यावे तसेच तेथील खड्डेही बुजविण्यात यावे, अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे.

सोसायटीमध्ये माझ्या दोन सदनिका आहेत. येथे उपाहारगृह सुरू करण्याचे विचाराधीन आहे. त्यासंदर्भात आरोग्य, अग्निशमन दलाकडे परवानगीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्याला अद्यापही मान्यता मिळालेली नाही. मान्यता मिळाली तर उपाहारगृहाचे नियोजन करण्यात येईल. कोणतेही बेकायदा बांधकाम करण्यात आलेले नाही. लोखंडी पूल उभारण्यासही मान्यता घेण्यात आली आहे. नगरसेवक असल्यामुळे मला बेकायदा बांधकाम करता येणार नाही. जी कामे करण्यात आली आहेत आणि येतील ती नियमानुसारच असतील.

Latest News