पुण्यातून दिल्ली किंवा अन्य शहरांमध्ये जाणाऱ्यांना कामाचे नियोजन करावे लागणार


पुणे : धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामासाठी विमानतळ रात्री बंद राहणार असून पुण्यातून दिल्लीसाठीचे पहिले विमान (airplane) सकाळी 8.05 वाजता उड्डाण करणार आहे. हे विमान दिल्ली विमानतळावर सकाळी 10.15 वाजता उतरेल. त्यामुळे पुण्यातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिल्ली दरवाजा सकाळी 10 नंतरच उघडला जाणार आहे. तर सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी शेवटचे उड्डाण असणार आहे. या वेळांनुसारच पुण्यातून दिल्ली किंवा अन्य शहरांमध्ये जाणाऱ्यांना कामाचे नियोजन करावे लागणार आहे.
लोहगाव येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या अस्तरीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी सोमवार (दि.26) पासून विमानतळ रात्री 8 ते सकाळी 8 या कालावधीत बंद राहणार असल्याने विमानांचे उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यावेळेतील विमानांची उड्डाणे दिवसभरातील विविध वेळांमध्ये बदलण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ संचालक कुलदीप सिंह यांनी यापूर्वी दिली होती. मात्र हे बदल केले तरी पुण्यातील पहिले उड्डाण सकाळी 8 नंतरच होणार असल्याने अन्य शहरात पोहचण्यासाठी प्रवाशांना जवळपास दहा वाजणार आहेत.
विमान कंपन्या व अन्य खासगी कंपन्यांच्या बुकिंग संकेतस्थळावर बदलेल्या वेळांनुसारच विमानाचे तिकीट बुकिंग करता येणार आहे. पुण्यातून सर्वाधिक विमानांचे उड्डाण दिल्लीकडे होते. पुण्यातून दिल्लीचे पहिले विमान सकाळी 8.05 वाजता उड्डाण करेल. हे विमान सकाळी 10.15 वाजता दिल्लीत उतरले. दिवसभरात 11 विमाने दिल्ली जातील. पुण्यात उड्डाण केलेले विमान सकाळी 10.15 दिल्लीत उतरेल. त्यामुळे विमानतळाबाहेर पडून इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रवाशांनी पुढे किमान एक ते दीड तास लागू शकतो.
पुण्यातून विमान उड्डाणांची स्थिती (दि.27 ऑक्टोबर)
पुणे ते दिल्ली – उड्डाण सकाळी 8.05, दिल्लीत 10.15 उतरणार
सायंकाळी 7.40 उड्डाण, रात्री 9.45 वाजता उतरणार
दिल्ली ते पुणे – उड्डाण सकाळी 6.30, उतरणार सकाळी 8.40
उड्डाण सायंकाळी 5.30, उतरणार सायंकाळी 7.35
पुणे ते हैदराबाद – पहिले उड्डाण दुपारी 2.15, शेवटचे 6.10
पुणे ते नागपुर – उड्डाण दुपारी 1.50
पुणे ते बेंगलुरू – पहिले उड्डाण दुपारी 4, शेवटचे सायंकाळी 7.45
पुणे ते चेन्नई – पहिले उड्डाण सकाळी 8.45, शेवटचे सकाळी 9.10