ऍल्प्रो इंटरनॅशनल स्कूल च्या पालकांना बेकायदेशीर फी साठी मानसिक छळ

:
पिंपरी ( प्रतिनिधी )एल्प्रो इंटरनॅशनल स्कुलकडून एकेक तासांनी पालकांना फोन करून शुल्क भरण्याचा तगादा पालकांकडे लावला जात आहे. त्यामुळे पालकांचा मानसिक छळ शाळेकडून चालू आहे
कोरोनामुळे सगळीकडे ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने कुठल्याहीप्रकारे भौतिक सुविधांचा वापर केला जात नाहीये. दुसरीकडे अनेक पालकांनी नोकरी गमावली आहे. त्यांनी शुल्क कसे भरायचे? चिंचवडगावातील एल्प्रो इंटरनॅशनल स्कुलकडून एकेक तासांनी फोन करून शुल्क भरण्याचा तगादा पालकांकडे लावला जात आहे. आजच्याघडीला दोन हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद आहे. लाखो रुपयांच्या शुल्काच्या तुलनेत शिक्षण काहीच मिळत नाहीये, ही वस्तुस्थिती मंगळवारी (ता. 27) अनेक पालकांनी पत्रकार परिषदेत मांडली.
महापालिका भवनातील पत्रकार कक्षेत एल्प्रो पॅरेट्स असोसिएशनच्यावतीने पत्रकार परिषदेत बोलविण्यात आली होती. यात अनेक पालक उपस्थिती लावली. प्रत्येकांनी शाळांकडून होणारी पिळवणूकविषयी कैफियत मांडली. पालक शीतल शिंदे म्हणाले, “मी स्वत: नगरसेवक आहे, तरी माझ्या मुलीचे शिक्षण ब्लॉक केले आहे. ग्लोबल इंटरनॅशनल म्हणून आम्ही या शाळेत प्रवेश घेतला. परंतु ग्लोबलची फ्रँचायझी काढून घेतली. एल्प्रो नामकरण केले. तरीही मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात आहे. दिवाळीनंतर रस्त्यावर उतरूनच शाळेला उत्तर द्यावे लागणार आहे.”
पालक प्रीतम जैन म्हणाले, “एक शिक्षक एकावेळी चार वर्गाच्या मुलांना शिकवत असतो. अशा परिस्थितीत मुले कशी शिकणार. शाळेच्या ऑनलाइन पोर्टलवरून पैसे मागितले जात आहे. दररोज निरोप दिले जात आहे. वर्षभराचे अगोदरच स्कुलबसचे पैसे भरून घेतले आहेत. तरीही यावर्षाचे वाहतूक शुल्काची मागणी केली जात आहे. त्याचेदेखील दीड हजार रुपये पेनल्टी घेतली जात आहे. ”
पालक सिरीशा कोंगरा म्हणाल्या, “माझ्या दोन मुली शाळेत शिकत आहे. परंतु शुल्क न भरल्यामुळे त्यांचे तडकाफडकी ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. परिणामी त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. एखादी शाळा अशाप्रकारे कशी वागू शकते.”
पालक दीपक शर्मा म्हणाले, “कोरोनामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. पहिल्या सत्रासाठी अर्धे शुल्क भरले आहे. जे पालक दरवर्षी शुल्क भरतात. तरी शाळेने माणुसकी दाखवली पाहिजे. ”