मुंगेरात हिंदूंचे रक्त सांडले. त्याविरोधात भाजपा कधी घंटा बडवणार?

मुंबई : ‘महाराष्ट्रात मंदिरे उघडा असे ‘घंटानाद’ करून सांगितले जात आहे. मंदिरांची टाळी तोडून आत जाऊ, अशा धमक्या दिल्या जात आहेत. ‘मुंगेर’सारखे हिंदुत्वावरील, दुर्गापूजेवरील हल्ले तर दडपले जातात, पण पालघरात सांडलेले साधूंचे रक्तही उसळत विचारते आहे, मुंगेरात हिंदूंचे रक्त सांडले. त्याविरोधात कधी घंटा बडवणार? निदान थाळ्या तरी वाजवा’ असं म्हणत शिवसेनेनं (shivsena) पुन्हा एकदा हिंदुत्त्वाच्या मुद्यावरून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मुंगेर हिंसाचाराच्या घटनेवरून ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्टं, अशा पद्धतीचा कारभार सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे’ असं म्हणत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला. मूर्ती खेचून विसर्जन करायला लावले. गोळीबारात एकजण ठार तर पंधरा लोक जखमी झाले. पोलिसांचे हे कृत्य जनरल डायरला लाजवणारे होते, असा आक्रोश सुरू आहे. दुर्गापूजेच्या विसर्जन यात्रेत हा सर्व गोंधळ झाला व पोलिसांनी सरळ बंदुका चालवल्या. अनुराग पोद्दार हा फक्त 18 वर्षांचा तरुण त्यात मारला गेला. दुर्गापूजा विसर्जनाबाबत हा गोंधळ, हिंसाचार व पोलिसी गोळीबार प. बंगाल, महाराष्ट्रासारख्या राज्यांत घडला असता तर एव्हाना ‘घंटा बजाव’छाप पोकळ हिंदुत्ववाद्यांनी नंगानाच घातला असता. दुर्गापूजेत गोळीबार म्हणजे हिंदुत्वावर हल्ला असल्याचे सांगून थयथयाट केला असता.

प. बंगाल, महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था ढासळली असून तेथे तत्काळ राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली असती. गेला बाजार या गोळीबाराची सीबीआय चौकशी तरी कराच या मागणीसाठी भाजप शिष्टमंडळ राजभवनात चहापानास गेले असते. पण काय हो घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेरात दुर्गापूजा मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारावर तुमची थोबाडे बंद का आहेत?  मुंगेरच्या रस्त्यावर भर मिरवणुकीत दुर्गा प्रतिमेची खेचाखेच पोलिसांनी केली. त्या खेचाखेचीत बेगडी हिंदुत्ववाद्यांची पीतांबरे अद्याप सुटली कशी नाहीत? असा सवालच सेनेनं भाजपला विचारला आहे.

नितीशकुमारांचे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावा, असा सूर बिहारातील भाजपवाल्यांनी काढलेला दिसत नाही. मुंगेरातील दुर्गा प्रतिमेचा अवमान व गोळीबार म्हणजे ‘जंगलराज’ आहे असे या ढोंगी डोमकावळ्यांना वाटू नये याचं आश्चर्य वाटतं. एकतर बिहारातील भाजपने डोळ्यांवर ‘सेक्युलर’ चष्मा चढवल्याने त्यांना मुंगेरची आक्रोश करणारी दुर्गामाता दिसत नाही. महाराष्ट्रात मंदिरे उघडा असे ‘घंटानाद’ करून सांगितले जात आहे. मंदिरांची टाळी तोडून आत जाऊ, अशा धमक्या दिल्या जात आहेत. या मंडळींना मुंगेरचा हिंसाचार, हिंदुत्वाचा अवमान याबाबत काहीच घेणं- देणं पडलेलं दिसत नाही. सोयीचे हिंदुत्व हे असेच असते, अशी टीकाही सेनेनं भाजपवर केली.

Latest News